You are currently viewing महागुरू…..

महागुरू…..

जागतिक “सा क व्य” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांचा सूर्याचे महात्म्य सांगणारा अप्रतिम लेख

तो कधी ही चुकत नाही .. खरच .. तो फार वक्तशिर आहे.
तो कधी ही कंटाळा करत नाही..वादळ ,वारा,ऊन ,पाऊस ,
बर्फ पडू दे .. विजा कडकडू दे … तो सदैव हजर असतो.
तो चोविस तास काम करतो. न थकता.. कुरकुर न करता.
तो आला नाही असा एक ही दिवस नसतो. तो हजर असतो
म्हणजे असतो अगदी कोणत्याही परिस्थितीत तो कामचुकार
पणा करत नाही …

तो नियमित येतो म्हणून ऋतू ही नियमित येतात . त्यांना यावेच
लागते.त्याच्या मुळेच सृष्टीचक्र अव्याहत व नेमाने चालते.
“ नेमेची येतो पावसाळा” अहो,तो ही त्याच्यामुळेच …
वाफ वर जाते कारण तो तापवतोच इतके की गारव्या साठी
तिला वर पळावेच लागते . आणि मग वारा ही तिच्या मदतीला
धावतोच की .. ती मग ढगात लपते..वारा सैरावैरा त्यांना पळवतो.. हो ढगांनी एकाजागी राहून कसे चालेल ..? कारण
त्याला सर्व सृष्टीचीच काळजी आहे ना? म्हणून तो वाऱ्याला
कामाला लावून ढगांना दाही दिशांना पांगवतो ..

आणि मग सुरू होतो त्यांचा लपाछपीचा खेळ .. आभाळ जणू
कमी पडते त्यांना नाचायला.. मग त्यांचा मोर्चा वळतो पृथ्वीकडे. ऊन वारा विजा वादळ सगळेच सामिल होतात या
खेळात.. इतके सुसाट धावतात की, झाडे ही घाबरून जमिनिशी वाकून त्यांना नमस्कार करतात.. उंच उंच माड
सुद्धा त्यांच्यापुढे झुकतात. लवून मानवंदना देतात हो त्यांचा
झपाटाच एवढा असतो की, त्यांच्यापुढे कुणाचे काही चालत
नाही. पक्षी प्राणी माणसे सारे घरट्याकडे धाव घेतात व
मुकाट सारे तांडव बघतात. हे तांडव नृत्य संपताच मग सुरू
होते ते धारा नृत्य … ढग बिचारे पळून पळून थकतात व
जिथे पाचू पेरलेले असतात अशा हिरव्यागार वनराईचा
आश्रय घेतात…

नि सर्व सामर्थ्यानुसार स्वत:ला झोकून देतात . सारी सृष्टी
अनिमिष नेत्रांनी हे धारानृत्य पहात सचैल न्हात सुखात
डोळे मिटून मनसोक्त भिजत आनंदात न्हाऊन तृप्तीचा आनंद
घेत आत्मानंदात दंग होऊन जाते. धन्य धन्य होते. कारण आता
आता तिच्यातून फुलणार असते नवचैतन्य. सृजनाची नवलाई
आता ती अनुभवणार असते म्हणून ती सर्वांगाने मोहरते..
तिच्या अंगावर सर्वत्र रोमांच फुलून येतात . अवघ्या काही
दिवसातच ती हिरव्या शालूने नटून गर्भवतीच्या तेजाने न्हाऊन
निघते .. आणि काही महिन्यातच अपार असे देणे देऊन
साऱ्या मानवतेला उपकृत करून टाकते. “घेशील किती दो कराने” असेच तिचे ते दान असते. ह्या मोतीदाण्यांबरोबरच
फुले फळे बगीचे सारे बहरतात . फुलपाखरे भुंगे नाचू
लागतात . पक्षी मधुर बोल बोलून तृप्तीचे गोड बोल बोलून
आपली कृतज्ञता व्यक्त करतात. सारी कडे विलसते ते
फक्त चैतन्य आणि चैतन्य .. बस …

ह्या अपार देण्याने कुणी उतू नये मातू नये म्हणून तो कधी
कधी आपला हात आखडता घेतो. एखाद्या हट्टी मुलासारखा
पाऊस तिकडे जातच नाही आणि मग हा गुरू ही त्या तापात
भर घालून सर्वांना त्राही भगवान करून सोडतो .. हो.. नसण्याची ही सवय हवी ना.. ? त्या शिवाय त्याची किंमत
कळणार कशी ? कधी कधी माप इतके ओततो की दिलेले
सर्व घेऊन जातो .. माणसाला , सृष्टीला अगदी दीनवाणी करून सोडतो . हो , हाडाचा शिक्षक आहे तो.. सर्वच गोष्टींची
सवय असायला हवी ना? त्या शिवाय माणूस कसा तग
धरणार …? म्हणून कधी कधी अगदी कठोर शिक्षकाची
काठी उगारून प्राप्त परिस्थितीशी झगडायलाही तो शिकवतो ..संघर्ष करायला शिकवतो म्हणून तर मानव जात
चिवटपणे आज ही टिकून आहे …

म्हणजे तो जे जे करतो ते सारे विचार करूनच करतो.
इतका नियमित , इतकी वर्षे , न चुकता , न थकता, न
कंटाळता, एवढ्या विश्वाच्या अवाढव्य पसरलेल्या ,
अफाट पसाऱ्याला वळण लावणारा महान गुरू आहे तो..
त्याच्या कडूनच आम्ही जीवन शिकलो ना ..?
हो.. त्याचे सारे शिष्य त्याचा. आदर्श पाळतातच ..कोण
म्हणून काय विचारता ? अहो , नद्या, तारे , वारे , ऋतू ,
यायचे थांबलेत कधी ? ते थोडे उशिरा किंवा आलेच
नाहीत तर .. काय होईल आपले ..?
माणसातल्या काही खूप चांगल्या शिष्यांनी ह्या महागुरूचे
हे शिस्तीचे धडे गिरवले म्हणून तर जगाला थोडेफार वळण
लागले ना…? नाही तर .. बऱ्याचशा नाकर्त्या शिष्यांकडून
देशाचे .. मानवतेचे कसे कल्याण झाले असते …?
हा महागुरू आहे .. म्हणून सर्वकाही आहे …
अजूनही त्याचे धडे आम्ही आचरणात आणले नसतील तर
अजूनही वेळ गेलेली नाही …

आपण सारे या महागुरूला सू्र्याला अनुसरूया … हीच आपली
आजची प्रतिज्ञा समजा …
चला तर नव्याने शिकण्याची सुरूवात करू या …

आदित्याय नम: । भास्कराय नम:

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा