जिल्हा अधिका-यांच्या आदेशाला बगल देण्याचा संताप जनक प्रकार?
तळेरे:प्रतिनिधी
ब-याच कालावधी नंतर १सप्टेबरपासून इ.१०वी व बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना कोविड ड्युटीतून मुक्त करावे आणि शाळा सुरू कराव्यात या व इतर प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेने सलग नऊ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण केले होते.या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत इ.१०वी व १२वी च्या शिक्षकांना कोविड ड्युटीतून त्वरित मुक्त करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
याच दिवशी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यामार्फत जाक्र/सिजिप/शिक्षण/माध्यमिक/आ-३/उपोषण ९०४/२०२१च्या लेखी पत्रात इ.10 वी व12 वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना कोविड ड्युटी देऊ नये असे आदेश तहसिलदार यांना दिले असल्याचे नमूद केलेले आहे.
असे असतानाही दहावी-बारावीला अध्यापन करणाऱ्या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शिक्षकांना संबंधित तहसीलदारांनी सरसकट ड्युटी लावल्या असल्याची तक्रार शिक्षकांनी शिक्षक भारती संघटनेकडे केली आहे.
या तालुक्यांतील तहसिलदार आणि गटशिक्षणाधिकारी चक्क जिल्हा अधिकारी यांच्या आदेशालाही जुमानत नाहीत का ? असा संतप्त सवाल शिक्षक व पालक वर्गात केला जात आहे.
प्रशासनाच्या या दुटप्पी भुमिकेबद्दल शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी खेद व्यक्त केला आहे.
दरम्यान शनिवारी प्र.माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्मा.श्री. आंबोकरसाहेब यांच्याशी दुरध्वनीवरुन संघटना अध्यक्षांनी चर्चा केली असून त्यांनी याबाबत संबंधित जिल्ह्यातील सर्व माध्यमिक मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी यांना आदेश पाठण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
इ.१०वी व इ.१२वीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी कोविड ड्युटीवर हजर राहू नये, संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कदापी होवू देणार नाही,त्यासाठी पुन्हा लढा उभारण्यासाठी तयार असल्याचा इशारा संजय वेतुरेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.
जिल्हा अध्यक्ष
श्री.संजय वेतुरेकर