भाजपचे नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांचा पत्रकार परिषदेत इशारा
कणकवली
संचयनी सेव्हिंग घोटाळा मी संसदेत उपस्थित केला होता. २००५ मध्ये यासंबंधी केस फाईल झाली आहे. १५ वर्षांत याबाबत न्यायालयात फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. एकदाही सुनावणी झाली नाही. या घोटाळ्यात चार आरोपी आहेत त्यातील एक आरोपी फरार आहे. तो जाहीर करून त्याच्यावर अटकेची कारवाई करा. संचयनीच्या मालमत्ता हस्तगत करून ठेवीदारांना पैसे परत करा. केंद्र सरकारने संचयनी प्रकरणी राज्य सरकार कडे स्टेटस रिपोर्ट मागितला आहे. या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई आणि ठेविदारांच्या हितासाठी मोदी सरकार आणि रिझर्व्ह बँकेची मदत घेऊ मात्र पुढील १०० दिवसांत संचयनिचा प्रश्न मार्गी लावणार, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.
कणकवलीत प्रहार भवन येथे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत, व्यासपीठावर उपस्थितीत होते.
आमदार नितेश राणें यांच्यासोबत पोलीस डिजी ना भेटणार आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही भेट घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक याची सुद्धा भेट घेतली आहे त्यांनीही कारवाई करण्यासाठी फेर तपास करण्याचे सांगितले आहे. फरार आरोपी कोण आहे त्याचे नाव पोलीस आधी कळतील त्यानंतर ते सांगू असे सांगतानाच श्री सोमय्या यांनी एकीकडे संचयनी घोटाळे बहाद्दूरांना शिक्षा व्हावी तर दुसरीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील संचयनीच्या हजारो गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता जप्ती करून विकून रिफंड देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या प्रकरणी दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय वित्त राज्य मंत्री कऱ्हाड यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. अशा घोटाळ्यातील बँकेच्या वसुलीसाठी जो केंद्राने कायदा केला आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.