साप म्हटल्यावर भल्याभल्यांची बोबडी वळते, अगदी रस्त्यात साप दिसला तरी लोक आपली वाट बदलतात, साप मागून येईल ह्या भीतीपोटी घाबरतात. परंतु तोच साप घरात शिरला तर स्वतःच्या घरात जाण्याची देखील हिम्मत होत नाही. अशावेळी आपल्या जीवाची बाजी लावून साप पकडतो तो सर्पमित्र…! असाच एक हरहुन्नरी युवा सर्पमित्र म्हणजे फोंडाघाट येथील संजय नेरुरकर…
सर्पमित्र संजय नेरुरकर हे दिवसा रात्री कधीही फोंडाघाट येथे कुणाच्याही घरात साप शिरला तरी कधीही धावून जातो. पंचक्रोशीतून कोणीही फोन केला तरी संजय वेळेचे भान न ठेवता नागरिकांच्या मदतीला धावून जातो. आपल्या दिवस रात्र सेवेचे कोणाकडूनही तो मोल घेत नाही. त्याच्या या कौतुकास्पद उपक्रमाचा पंचक्रोशीतील सर्वानाच अभिमान वाटतो. पंचक्रोशीतील लोकांनी, ग्रामपंचायतीने त्याच्या धाडसाचे कौतुक करत अनेकदा त्याचा सत्कार देखील केला आहे.
फोंडाघाट येथे आलेली भली मोठी नागीण पकडून संजयने नैसर्गिक अधिवासात सोडली. आतापर्यंत संजयने अनेक सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडत जीवदान दिले आहे, त्यामुळे सर्पमित्र म्हणून या गुणी युवा संजय नेरूरकरला फोंडाघाट पंचक्रोशीत मानाचे स्थान मिळाले आहे.