You are currently viewing उद्यापासून जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह

उद्यापासून जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना सप्ताह

१ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला चार वर्षे पूर्ण होत असून गेल्या चार वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ हजार २६५ महिला लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या बैंक खातीव प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी ४८ लाख ५७ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या प्रचार प्रसिद्धी साठी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१ या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात “मातृवंदना सप्ताह” राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत जिल्ह्यात “मातृवंदना सप्ताह” राबविण्या बाबत आज जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, डॉ.संदेश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना संजना सावंत म्हणाल्या, “प्रधानमंत्री मातृ वंदना योजना” ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत १ जानेवारी २०१७ रोजी अथवा तद्नंतर ज्या पहिल्या खेपेच्या गरोदर मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली आहे. अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी देण्यात येतो. या योजनेचा ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात “मातृवंदना सप्ताह” साजरा करून योजनेची प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.

या योजने अंतर्गत पात्र लाभार्थीना १०००, २०००,२०००,अश्या तीन हप्त्यांमध्ये एकूण ५ हजार रुपये लाभ दिला जाणार आहे. सदर योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व पहिल्या खेपेच्या मातांना दिला जातो. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत २०१७ पासून गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील १७ हजार २६५ लाभार्थीना ७ कोटी ४८ लाख ५७ हजार एवढी रक्कम गरोदर माताच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली आहे.

१ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१ या सप्ताह कालावधीमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सर्व सेवा कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा