You are currently viewing सागरी सुरक्षेसाठी पोलीस, प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सतर्क रहावे – शिवाजी कोळी

सागरी सुरक्षेसाठी पोलीस, प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सतर्क रहावे – शिवाजी कोळी

सिंधुदुर्गनगरी

देशाच्या सुरक्षेसाठी सागर किनाऱ्यांची सुरक्षाही तितकीच महत्वाचे आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलीस, प्रशासन याबरोबरच स्थानिक नागरिकांनीही सतर्क राहणे तितकेच महत्वाचे असल्याचे सागर सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले. कोणतीही अनोळखी व्यक्ती, अनोळखी बोट दिसल्यास त्याची माहिती नागरिकांनी तातडीने 1093 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी असे आवाहन ही श्री. कोळी यांनी केले.

            सागरी सुरक्षेविषयी आज पोलीस विभागाती ऑनलाईन बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री. कोळी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, कस्टम, कोस्ट गार्ड यासह जिल्ह्यातील सागरी पोलीस स्थानकांचे अधिकारी उपस्थित होते.

            ग्राम पातळीवरील सागर सुरक्षा दलांच्या नियमित बैठका घेऊन त्यांच्या संपर्कात रहावे अशा सूचना देऊन श्री. कोळी म्हणाले, पोलीस दल गस्त करतच असते. 1 सप्टेंबरपासून नियमित गस्त सुरू होणारच आहे. पण, स्थानिक नागरिक हे जास्त सतर्क असणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक सागरी सुरक्षा दलांचे प्रमुख, पोलीस पाटील यांच्या संपर्कात पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी रहावे. कलर कोडींची प्रक्रिया सुरू आहे. त्याविषयी मच्छिमारांमध्ये जागृती करावी अशाही सूचना त्यांनी दिल्या.

            यावेळी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. बनकर म्हणाले, सागर किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी मार्ग, सागरी महामार्ग या ठिकाणी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच निर्मनुष्य बेटं, अनोळखी बोटी, व्यक्ती यांची तपासणी करून संशय आल्यास त्यांना ताब्यात घेतले जावे. त्यांचे परवाने तपासावेत. नवीन रहायला आलेल्या व्यक्तींची माहिती घ्यावी. संशयीत व्यक्ती, वस्तू आढळल्यास त्याची माहिती तात्काळ कंट्रोल रुमला द्यावी. अशा सूचनाही श्री. बनकर यांनी यावेळी केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा