आता कमर्शिअल नारळ शेती करा:- एम के गावडे, प्रज्ञा परब यांचे आवाहन
वेंगुर्ले
जागतिक नारळ दिनानिमित्त २ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या कार्यालयात तज्ज्ञांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.नारळ शेती ही कोकणातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखविणारी आहे. गेली अनेक वर्षे ठराविक शेतकरी नदी-नाल्यांच्या शेजारीच नारळाचे उत्पन्न घेत आहेत. मात्र आता कमर्शियल पद्धतीने नारळ शेती करणे आवश्यक आहे.
कोकणातील जमीन हवामान हे नारळ उत्पादनासाठी पोषक आहेत. नारळ शेती शाश्वत उत्पादन देणारी आहे. बदलत्या परिस्थितीत काही रोग, वन्यप्राणी यांचा उपद्रव होत आहे. मात्र कोकण कृषी विद्यापीठ व नारळ विकास बोर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याने कमीत कमी नुकसान होऊन जास्तीत जास्त नफा होईल.
केरळ, कर्नाटक, तामिळनाडू यासारख्या राज्यांत उंच टेकड्यांवर सुद्धा नारळ लागवड झाली आहे. आपल्याकडे असे प्रयत्न होणे गरजेचे आहे.या कल्पवृक्षाचे ऋण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जगामध्ये २ सप्टेंबर हा दिन नारळ दिन म्हणून साजरा होतो. यावेळी प्रगतशील नारळ उत्पादक शेतकर्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कृषिभूषण एम. के. गावडे व काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी केले आहे.