अफगाणिस्तान देश दोन बॉम्बस्फोटच्या घटनांनी हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर हे दोन स्फोट झाले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
तसेच अनेक नागरीक यामध्ये जखमी झाल्याची माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेननं काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.
“काबूल विमानतळाच्या ऐबी गेटच्या बाहेर आत्मघातकी हल्ला झाला. हल्लेखोर गोळीबार करत आला आणि स्वत:ला स्फोटकांनी उडवलं. विमानतळाच्या या गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात होते. तर दुसरा आत्मघातकी हल्ला हॉटेलबाहेर झाला. पाश्चिमात्य देशातील सैनिकांना लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे.”, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. काबूलनंतर कझाकिस्तानच्या ताराज शहरात स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एका लष्करी तळावर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आत्मघातकी हल्ल्यापूर्वी काबूल एअरपोर्टवर इटलीच्या एका विमानावर गोळीबार करण्यात आला होता. या विमानात अफगाणिस्तानातील १०० शरणार्थी होते.