You are currently viewing खासदार नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा…..गर्दी आणि राडे

खासदार नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा…..गर्दी आणि राडे

कोकणात येण्यासाठी सर्वसामान्यांना मात्र कोरोनाचे निर्बंध

*विशेष संपादकीय….*

गेले दीड वर्ष देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आणि कोरोना आटोक्यात येतो न येतो तोच विरोधकांकडून अगदी शाळा, महाविद्यालय बंद असतानाही मंदिर उघडण्यासाठी रस्त्यावर येण्याची भाषा होते, याच गडबडीत पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढतो, निर्बंध लागू होतात, लोकांवर उपासमारीची पाळी येते, कामधंदे, रोजगार बंद आणि जे सुरू असतात तिथे जाण्यासाठी प्रवासाची सोय नसते असे एक ना अनेक संकटे समोर उभी असतानाच थोडा कुठे कोरोना सुट्टीवर चाललाय असे वाटत असतानाच कोकणातील भाजपाचे राज्यसभेवरील खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळते काय आणि त्याचा जल्लोष करायला नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते मिळालेल्या मंत्रिपदाचा सदुपयोग जनतेच्या कल्याणाकरिता करून जनहितातून जनतेचा आशीर्वाद घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करतात. अनेक ठिकाणी राज्याच्या सत्तेतील शिवसेनेकडून विरोधाची भाषा होते, हमरातुमरीवर येत अर्वाच्च असंसदीय भाषा वापरल्याने अटक नाट्य रंगतं. अटक, कोर्ट कचेरी, जामीन अशा फेऱ्यातून जात जन आशीर्वाद यात्रा काही काळासाठी स्थगित होते.
इथे प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या संपूर्ण राजकारणात शिवसेना असो वा भाजपा, कोरोनाचे नियम, निर्बंध धाब्यावर बसवून मोठ्या संख्येने आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतात. मग सर्वसामान्य जनतेला घरातून बाहेर पडताना, अति महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना, आपल्या रोजीरोटीसाठी रेल्वे प्रवास करताना आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या सणासाठी गावी जातानाच कोरोना खायला येतो का? सर्वसामान्य जनतेवर कठोर निर्बंध लादले जाताना राजकीय यात्रा, मोर्चे, भाषणे, जमाव, गर्दी याला सरकार का अभय देतं? राजकीय राड्यांमधून नक्कीच राजकीय पक्षांचा फायदा असतो परंतु त्या मोर्चे, आंदोलने यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र मार खातात, त्यांच्यावर कोर्टात केसेस दाखल होतात, अर्ध आयुष्य स्वतःचे खिशातील पैसे घालून राजकीय केसेस लढाव्या लागतात. आणि महत्वाचे म्हणजे या राडे, आंदोलने, मोर्चे यामुळे कोरोना पसरला तरी तो जिवंत झाला किंवा कोरोनाने लोक मेले तरी त्या बातम्या दाबून टाकल्या जातात. म्हणजे राजकीय राड्यांमधून कोरोना होत नाही तर तो चिरडून मरतो आणि सर्वसामान्य जनता स्वतःच्या चारचाकी वाहनातून गेली तरी मास्क लावायचं, सोशल डिस्टनसिंग पाळायचं, अन्यथा कोरोना होतो. असाच आजकाल सरकारच्या निर्णयांमधून दिसत आहे.
कोकणातील कितीतरी थोर नेते मान.बॅरिस्टर नाथ पै, मान.मधू दंडवते, मान.सुरेश प्रभू आदी लोकमान्य नेते जनतेतून निवडून येत केंद्रात मंत्री झाले, परंतु त्यांनी कधीही राजकारण करण्यासाठी, शोबाजी साठी यात्रा वगैरे काढून जनतेत मिसळले नाहीत. मान.अडवानींनी देखील रथयात्रा काढलेली परंतु ती एका उच्चतम पातळीवर यशस्वी झाली होती, त्यावेळी देशावर कोरोनासारखे संकट देखील नव्हतं किंवा राडेही झाले नव्हते. आज कुठेतरी भाजपा सारख्या शिस्तबद्ध पक्षात ही संस्कृती बदलताना दिसते आहे. त्यामुळे भाजपाच्याच जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.
सर्वसामान्य जनता आणि नेत्यांमध्ये लोकशाही देशात असा भेदभाव का केला जातो? कोरोनाच्या काळात एकीकडे रोजीरोटीसाठी लोकांना तळमळावे लागत असताना जनतेची पर्वा करताना कुठलाच पक्ष दिसत नाही किंवा जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरणारे राजकारणी दिसत नाहीत. परंतु सत्तासंघर्षासाठी त्याच जनतेला मूर्ख बनवत रस्त्यावर खेचत आहेत. आपापसात मारामाऱ्या, दुश्मनी करायला लावत आहेत आणि स्वतः मात्र राजकीय पोळी भाजून घेत आहेत. आपल्या नेत्यांच्या प्रेमापोटी रस्त्यावर उतरणारी ही दुधखुळी जनता स्वतःचा वापर होतो आहे हे केव्हा समजणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा