You are currently viewing प्रेरणा’ अंतर्गत एमपीएससीसाठी फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन अभ्यासासोबतच स्वतःसाठी किमान एक तास देणे महत्वाचे – सुधीर पाटील

प्रेरणा’ अंतर्गत एमपीएससीसाठी फेसबुक लाईव्हद्वारे मार्गदर्शन अभ्यासासोबतच स्वतःसाठी किमान एक तास देणे महत्वाचे – सुधीर पाटील

सिंधुदुर्गनगरी

 एमपीएससीचा अभ्यास करत असताना अभ्यासासोबतच स्वतःसाठीही दिवसातील किमान एक तास देणे आवश्यक असल्याचे देवगडचे परीविक्षाधीन प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले. प्रेरणा उपक्रमाअंतर्गत आज महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांविषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, देवगडचे परीविक्षाधीन प्रांताधिकारी सुधीर सुभाष पाटील आणि परीचलन अधिकारी तथा परीविक्षाधीन तहसीलदार सुधीर बाजीराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रेरणा अंतर्गत जिल्हा प्रसासनाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करता येईल याबाबत या सत्राची प्रस्तावना करताना माहिती दिली.

            विषयानुसार पुस्तकांची निवड करणे फायद्याचे असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, परीक्षेचे दडपण सर्वांनाच येते, असे दडपण न घेता अभ्यास करणे महत्वाचे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आठवड्यातून एकदा चांगला चित्रपट पाहणे, मित्र, कुटुंबिय यांच्याशी चर्चा केल्याचा फायदा होतो. विषयांची मुलभूत संकल्पना चांगल्या करणे महत्वाचे आहे. किमान दोन वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणेही महत्वाचे आहे. चालू घडामोडींचा अभ्यास करताना वर्तमानपत्रांचे वाचन आणि मार्गदर्शनपर मासिकांचे वाचन करावे. प्रत्येक टप्प्यावर वेळापत्रकानुसार नियोजन करुन अभ्यास करणे फायद्याचे ठरते.

            परीविक्षाधीन तहसिलदार श्री. पाटील म्हणाले, अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी फिरणे, थोडावेळ खेळणे, मित्रांसोबत चर्चा करणे याचा फायदा होतो. मुलाखतीमध्ये विशेषतः आपल्या पदवी अभ्यासक्रम आणि पार्श्वभूमी या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे याविषयांचा अभ्यासही महत्वाचा आहे.

            यावेळी एमपीएससीच्या परीक्षांचे स्वरुप, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, पुस्तकांची निवड, अभ्यास पद्धती यासोबतच एसटीआय परीक्षांविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा