नगराध्यक्ष समीर नलावडे यांची घेतली भेट : नियोजनाची घेतली माहिती
कणकवली
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा २५ ऑगस्टला कणकवलीत येत आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहर नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्याअनुषंगाने भाजपा व कणकवली नगराध्यक्ष यांच्याकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला यांनी आज घेतला. त्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
नारायण राणे यांचे कणकवली शहरात आगमन २५ ऑगस्ट रोजी नेमके किती वाजता होईल, त्यावेळी कशा पद्धतीने स्वागत सोहळ्याची तयारी केली जाणार आहे. यादरम्यान किती वाहने या रॅलीमध्ये असतील, महामार्गाने जाणारे ट्राफिक जाम होऊ नये या व अन्य बाबींचा आढावा पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्याकडून घेण्यात आला. तसेच पटवर्धन चौकात नारायण राणे यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास कसा असणार आहे याची देखील माहिती मुल्ला यांनी घेतली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या संपूर्ण नियोजनाची माहिती देत प्रशासनाला या वेळी पूर्णपणे सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देखील पोलीस निरीक्षकांना दिली.