संस्थानकालीन वारसा असलेल्या सावंतवाडीची नारळी पौर्णिमा
संपादकीय…..
नारळी पौर्णिमा… यालाच आपल्या ग्रामीण भाषेत पोवत्याची पूनव असेही म्हटले जाते. पोवतं म्हणजे राखी,,, राखीची पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सागराला कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून सागराची पूजा करत नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, तसेच घराघरात ती राखी पौर्णिमा म्हणूनही साजरी करण्याची प्रथा आहे. बहीण भावाच्या विश्वासाच्या, अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या रक्षणासाठी भावाच्या मनगटावर रेशमी धागा बांधते आणि भावाला ओवाळून आपलं रक्षण करण्यास सांगते. ही त्यामागची भावना. देव आणि दानव युद्धात देवांचा पराभव होणार असे दिसत असतानाच इंद्र देवांची पत्नी इंद्राणीने इंद्राच्या हातावर रक्षणासाठी एक धागा बांधला आणि देवांचा विजय झाला, अशीही राखी पौर्णिमेबाबत कथा सांगितली जाते.
महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरची अर्थव्यवस्था ही सागरावरच अवलंबून आहे, त्यामुळे श्रीफळ सागराला अर्पण करून सागराप्रती कृतज्ञता व्यक्त करणे व मासेमारी करताना आपलं रक्षण करणे अशी भावना असते. नारळी पौर्णिमा झाल्यावरच मच्छीमार मासेमारीसाठी आपल्या नौका समुद्रात लोटतात.
सावंतवाडीची नारळी पौर्णिमा ही सुद्धा विशेष आकर्षण आहे. सावंतवाडी शहराला संस्थानकालीन वारसा लाभलेला आहे, त्यामुळे सावंतवाडीची नारळी पौर्णिमा सुद्धा संस्थानकालीन वैशिष्ठय असलेलीच आहे. सावंतवाडीच्या मोती तलावात शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. सावंतवाडीच्या पोलीस बँडच्या तालावर वाजतगाजत राजघराण्याचा मानाचा नारळ तलावाच्या काठी आणला जातो. राजघराण्याचे राजे, युवराज यांच्याहस्ते श्रीफळाची विधिवत पूजा करून मोती तलावास राज्यांकडून सर्वप्रथम नारळ अर्पण केला जातो, व तदनंतर सावंतवाडीतील नागरिकांकडून मोती तलावास नारळ अर्पण केले जातात. मोती तलावात अर्पण केलेले नारळ काढण्यासाठीही पट्टीचे पोहणारे मोठ्या उत्साहात पाण्यात उतरलेले असतात. मानाचा नारळ काढण्यासाठीही त्यांच्यात चढाओढ असते.
सावंतवाडीत तलावाच्या काठावर नारळ वाढविण्याची स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाते. तसेच विविध कार्यक्रम सुद्धा होतात. सावंतवाडीतील हा संस्थानकालीन परंपरा लाभलेला नारळी पौर्णिमा उत्सव पाहण्यासाठी तलावाच्या काठावर गर्दीचा महापूर आलेला असतो. सावंतवाडी शहर हे उत्सवी लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोणताही उत्सव असो वा सण, सावंतवाडीत तो महोत्सव होऊन जातो, अशी सावंतवाडीची जनता उत्सवप्रेमी आहे.