ठाणे येथील सराफ भरत जैन (४०) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. १५ ऑगस्टला त्यांचे अपहरण झाले होते. शुक्रवारी कळवा खाडीत त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ठाणे येथील मखमली तलाव परिसरात भरत जैन राहात होते. त्यांचे चरई येथील दगडी शाळा परिसरात सराफाचे दुकान आहे. १५ ऑगस्टला भरत जैन घरी परतले नसल्याने त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी त्यांच्या दुकानाजवळील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, भरत यांना एका कारमधून तीन जण नेत असल्याचे आढळून आले. त्यांचे अपहरण झाल्याचे समोर येताच १७ ऑगस्टला याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नौपाडा पोलिसांनी दाखल केला.
दरम्यान, शुक्रवारी कळवा खाडीतील गणपती विसर्जन घाटाजवळ एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळून आला. याची माहिती कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्यांचे हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते. कळवा पोलिसांना नौपाडा पोलीस ठाण्यात भरत जैन यांच्या अपहरणाची नोंद मिळाली.