You are currently viewing सिंधुदुर्गातील एका प्रमुख पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची राष्ट्रवादीकडे कूच..

सिंधुदुर्गातील एका प्रमुख पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची राष्ट्रवादीकडे कूच..

आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सत्तेचा सारीपाट हा विलक्षण असतो. सत्तेत असणाऱ्या पक्षाकडे अनेकांचा ओढा असतो, त्यात मुख्यतः ज्या पक्षाच्या हाती सत्तेची चावी असते आणि तळागाळातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना राज्यस्तरावर वाली असतो त्या पक्षामध्ये काही लोकप्रतिनिधी उड्या मारत असतात. सिंधुदुर्ग जिल्हा त्याला अपवाद नाही. निवडणुका आल्यावर एका रात्रीत तीन पक्ष बदलणारे सुद्धा या जिल्ह्याने अनुभवले आहेत आणि आपल्या कारकिर्दीत गरजेनुसार आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी देखील वेळोवेळी पक्ष बदलणारे देखील पाहिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एका प्रमुख पक्षाचा जिल्हाध्यक्षच राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची बातमी येऊन धडकली हे जिल्ह्यासाठी नाविन्य नाही, परंतु कुठल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार हे मात्र औत्सुक्याचे नक्कीच आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यात आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील वासुदेवानंद सभागृहात उद्या सकाळी 10 वाजता आम.शेखर निकम यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सत्तेचा कणा आहे. अनेक मुख्य मंत्रीपदे देखील राष्ट्रवादीकडे आहेत, त्यामुळे सत्तेची गोड फळे राष्ट्रवादी चाखत असल्याने व राज्यात राष्ट्रवादीकडे अजित दादांच्या रूपाने कणखर नेतृत्व असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे.
गेली दहा वर्षे राष्ट्रवादीला जिल्ह्यात कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली होती, त्याच राष्ट्रवादीकडे आज कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. येणाऱ्या विधानसभेसाठी जर काँग्रेसशी युती झाली तर जिल्ह्यातील देवगड आणि सावंतवाडीची जागा राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडून आमदारकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता गृहीत धरून कदाचित त्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादी प्रवेश तर होत नाही ना? असे तर्कवितर्क लोक काढू लागले आहेत. आजकाल राजकारणात लोककल्याणापेक्षा स्वहित जपण्याकडे लोकप्रतिनिधींचा कल वाढलेला आहे. फळाची अपेक्षा करू नये हे केवळ बोलण्यापूरते आणि कागदावरच शिल्लक राहिले असून फळाच्या अपेक्षेशिवाय राजकारण आज उरलेलं नाही हे मात्र खरं.
एका प्रमुख पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद आपल्याकडे असताना देखील सत्तेतीलच दुसऱ्या पक्षात आता कोण उडी मारतो हे मात्र काहीच तासात जिल्हावासीयांना दिसून येईल, तोपर्यंत वेट अँड वॉच….

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =