You are currently viewing माडखोल धरण कालव्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करणार – विनायक राऊत

माडखोल धरण कालव्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करणार – विनायक राऊत

सावंतवाडी

माडखोल धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून झालेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.याबाबत अधीक्षक अभियंता समवेत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे माडखोल ग्रामस्थ व पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान जगात कोरोनाचा कहर असताना पाणीवापर संस्थेची निवडणूक प्रक्रिया लावणे चुकीचे आहे, अशी नाराजी व्यक्त करून जाहीर करण्यात आलेली निवडणूक तात्काळ रद्द करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. श्री.राऊत यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत आज माडखोल धरण परिसराला भेट दिली.

यावेळी राजकुमार राऊळ, सूर्यकांत राऊळ, जीजी राऊळ, देविदास राऊळ, सत्यवान राऊळ, अशोक लातीये, संतोष राणे, आनंद राऊळ, कृष्णा राणे, विजय राऊळ, तसेच शिवसेना महिला जिल्हा संघटक जानवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवासेनाधिकारी सागर नाणोसकर, शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर, जि. प. सदस्य राजेंद्र मुळीक, मायकल डिसोजा, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, एकनाथ नारोजी, योगेश नाईक, संदीप माळकर, विजय राऊळ, श्री मुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

माडखोल येथील पाणी वापर संस्था सदस्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी खासदार विनायक राऊत आणि आमदार दिपक केसरकर यांच्यासह अधिकाऱ्यांसमवेत माडखोल धरणाची पाहणी केली. त्यावेळी माडखोल ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. माडखोल लघुपाटबंधारे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी धरणात जलसमाधी आंदोलन केले होते. मात्र याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी या आंदोलनाची तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्याचा निर्णय घेतल्याने ह्या ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र आज खासदार विनायक राऊत यांनी माडखोल येथील धरणावर प्रत्यक्ष पाहणी केली. आणि ग्रामस्थांकडून माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थांनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात झालेले भ्रष्टाचार तसेच निकृष्ट काम त्याबाबत हकीगत खासदार राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या धरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना बिल अदा करण्यात आल्याने सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी पाणी वाटप सहकारी संस्थेचे निवडणुकीचा आदेश केल्याबद्दल त्यांचे तक्रार शेतकर्‍यांनी केली असता कोरोनामुळे जग थांबलेले असताना पाणीवापर सहकारी संस्थेची निवडणूक कशी काय घेतली जाते, तात्काळ त्याला स्थगिती देण्यात यावी, असे निर्देश खासदार राऊत यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा