येत्या १५ ऑगस्टला तोंडवळी तळाशिल ग्रामस्थ करणार उपोषण; मनसेचा पाठिंबा
शासनाला जाग आणण्यासाठी उपोषण आंदोलनात मनसेचा सक्रिय सहभाग असेल – तालुकाध्यक्ष विनोद सांडव
तोंडवळी तळाशिलच्या समुद्रकिनारी समुद्राच्या अतिक्रमणांमुळे होणारी धूप तत्काळ थांबविण्यासाठी वेळोवेळी निवेदने शासन दरबारी पाठवूनही अद्याप त्याची दखल न घेतल्याने तळाशिलच्या समुद्रकिनारी १५ ऑगस्टला तळाशिल ग्रामस्थ महिला भगिनीसह सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहेत.या आंदोलनास मनसेचा पाठिंबा असल्याचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की तोंडवळी तळाशिल ग्रामस्थांनी मनसे नेते परशुराम उपरकर यांचे याविषयी लक्ष वेधले होते.श्री.उपरकर यांनी तात्काळ गावाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती.यावेळी निवेदनही ग्रामस्थांकडून देण्यात आले होते.दिलेल्या निवेदनानुसार उपरकर यांनी अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार,पत्तन विभागाचे मुख्य अभियंता,अधिक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.सदर पत्रात मा.अजित पवार यांनी समुद्रसंरक्षणासाठी शासन २५० कोटी कोकणातील बंधार्याच्या कामावर खर्च करणार आहे अशी घोषणा केली होती.यातील निधी तळाशिलच्या बंधार्यावर प्राधान्याने खर्च करण्यात यावा व अपूर्ण काम तातडीने पुर्ण करण्याची मागणी आहे.
उधाणाच्या वेळी समुद्राचा तळाशिल गावाला धोका निर्माण झाला आहे.या पावसात अनेक वीज पोल समुद्राने गिळंकृत केले आहेत.रस्त्यापलीकडील घरे भीतीच्या छायेत आहेत.मालवण तालुक्यातील तळाशिल येथील समुद्र किनारी धुपप्रतिबंक बंधार्याचे रखडलेले काम तातडीने पुर्ण करण्यासाठी तळाशिल ग्राम विकास मंडळाने वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले.पण निधी अभावी दोन्ही टप्प्यातील कामे मंजुर झालेली असतानाही रखडली आहेत.
त्याचबरोबर कालावल खाडीतील तळाशिल रेवंडी समोरील खाडीमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. हा वाळू उपसा बंद करण्याबाबत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही तो अद्याप सुरूच आहे. या वाळू उपशामुळे तळाशिल किनार्याचा भूभाग खाडीमध्ये वाहून जात असल्याने तळाशिल येथील रहिवाशांची घरे वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी येत्या १५ ऑगस्टला तळाशिल ग्रामस्थ व महिला भगिनीसह सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहेत.या आंदोलनास मनसेचा पाठिंबा असल्याचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी सांगितले.