दोन वाहने घसरली; काही काळ वाहतूक ठप्प, कोकिसरे रेल्वे फाटक नजीक घटना…
वैभववाडी
टँकरमधील गुळाची काकवी रस्त्यावर सांडल्याने तरळे-वैभववाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी पहाटे कोकिसरे रेल्वे फाटक नजीकच्या धोकादायक वळणावर ही घटना घडली. यात दोन वाहनांचा अपघात होऊन नुकसान झाले आहे. वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याने रस्ता धूवून काढला. त्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत झाली.
कोल्हापूरहून कणकवलीकडे गुळाची काकवी घेऊन टँकर जात होता. रेल्वे फाटक नजीकच्या धोकादायक वळणावर अचानक काकवी मार्गावर सांडली. पाठोपाठ येणाऱ्या वाहनांना याची कल्पना नसल्याने या ठिकाणी वाहने घसरली. एक टेंपो रस्ता सोडून झाडावर आदळला. तर लक्झरी बस घसरून साईडपट्टीत फसली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मारुती साखरे, अभिजीत तावडे, अभिजीत मोरे, गिरीश तळेकर व मंगेश कडू घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता चकाचक धूवून काढला. त्यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांच्या तत्परतेबद्दल वाहनचालक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.