जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
ओरोस
कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने कार्यक्रमांवर बंदी घातल्याने हवालदिल झालेल्या विविध कला क्षेत्रातील रंगकर्मींनी आज एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. तर आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधत जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे होत असलेले हाल आणि कार्यक्रमावरील बंदी मुळे होत असलेली उपासमार याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंगकर्मीच्या विविध मागण्यांसाठी आज ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग” या संघटनेच्या वतीने आंदोलन छेडले.
कोरोनाच्या नियमांचे पालन करत आज केलेल्या या आंदोलनात हार्दिक शिंगले, दादा कोनस्कर- राणे, सुधीर कलिंगन, देवेंद्र नाईक, तुषार नाईक, सागर सारंग, विवेक कुडाळकर, कल्पना बांदेकर, नमीती गावकर, सुजाता शेलटकर, भूषण बाक्रे, आदी नाट्यकर्मींसह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील नाट्यकर्मी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यामध्ये महिला कलाकरांचाही मोठा सहभाग होता.
गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे कार्यक्रमांवर बंदी असल्याने विविध कला क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत “रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग” या संघटनेच्या वतीने २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते तर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी ८ दिवसाची मुदत दिली होती. मात्र रंगकर्मिच्या मागण्याबाबत कोणतीही दाखल घेतली नसल्याने जिल्ह्यातील रंगकर्मीनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून तीव्र संताप व्यक्त केला.
तर याबाबत आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी याना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात त्यांनी कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षात रंगकर्मींचा व्यवसाय ठप्प झाला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या रंगकर्मीकडे शासनाने पाठ फिरवली आहे. कोणतेही सहकार्य किंवा आर्थिक मदत केली नाही. सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या रंगकर्मींची कोरोनामुळे कमाईची सर्वच दारे बंद झाली आहेत. अशावेळी शासनाने त्यांना आर्थिक आधार देणे आवश्यक होते. मात्र शासनाने रोजंदारीवर काम करणाऱ्या रंगकर्मीकडे पाठ फिरवल्याने व सर्वच कार्यक्रमवर बंदी घातल्याने सिंधुदुर्गसह राज्यभरातील रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत. त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा.असे नमूद केले आहे.
आपल्या समस्या व मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील रंगकर्मीं एकजूट झाले असून त्यांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपली एकजूट दाखवली. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधले. यामध्ये सिनेमा, मालिका, नाटक, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, पोवाडा ,लावणी, दशावतार, डोंबारी अशा विविध कला व लोककला सादर करणाऱ्या कलाकारांच्या सोबत वाद्य कलाकाराचा समावेश होता.
🖋️सिंधुदुर्ग/दि.०९ ऑगस्ट:- गेले दीड वर्ष कोरोना महामारीमुळे रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी बंद असल्याने, त्या वर अवलंबून असलेल्या कलाकारांचे आणि तंत्रज्ञ व सहाय्यक यांची उपासमार होत असून, याकडे शासनाने अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंगकर्मीच्या विविध मागण्यांसाठी आज सोमवार दि.९ ऑगस्ट क्रांतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग या संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन देऊन रंगकर्मीसाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात सिनेमा, मालिका, नाटक, तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी अश्या विविध कला व लोककला सादर करणाऱ्या कलाकारांसोबत वाद्य कलाकारांचा देखील सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग संघटनेचे संघटक हार्दिक शिंगले म्हणाले की, या कठीण काळात शासनाचा कलाकारांकडे दुर्लक्ष झाला आहे. अनेक कलाकारांचे घर नेहमी होणाऱ्या प्रयोगावर रोजंदारीवर चालत आहेत. परंतु, या काळात कार्यक्रम होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कलाकारांकडे आपल्या मुलांची फी भरायला देखील पैसे नसल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. शासन दरबारी अनेक कलाकारांची नोंद नाही आहे. ती होणे गरजेचे आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी एकपात्री किंवा दोन – तीन लोकांच्या मदतीने मोकळ्या जागी होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी देण्यात यावी, नियमांचे पालन करून नृत्य व संगीत क्लासेस सुरू करण्यात यावे, सर्व रंगकर्मंसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करावी, कोरोना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत रंगकर्मींना दरमहा ५ हजार इतका उदरनिर्वाह हप्ता देण्यात यावा, तसेच जिल्ह्यात शासकीय कला अकादमी निर्माण करावी, महाराष्ट्रात विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद करावी, माथाडी कामगार बोर्डाच्या धरतीवर रंगकर्मी बोर्डाची स्थापना करावी. अशा विविध मागण्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आल्या आहेत.