You are currently viewing कणकवली शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे न भूतो न भविष्यती असे स्वागत होणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे न भूतो न भविष्यती असे स्वागत होणार – नगराध्यक्ष समीर नलावडे

स्वागताच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात: तो क्षण असेल डोळ्यांचे पारणे फेडणारा

कणकवली

केंद्रीय सूक्ष्म मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात ​२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी आगमन होत असतानाच जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून नारायण राणे यांचे कणकवली शहराच्यावतीने कणकवली पटवर्धन चौक येथे न भूतो न भविष्यती असे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कोकणचे दादा नारायण राणे यांच्या स्वागताची कणकवली नगरपंचायतच्या सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवकां​ ​तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. आतापर्यंत कणकवलीत स्वागत सोहळा झाला नाही अशा भव्य स्वरूपात हे स्वागत करण्यात येणार आहे. या स्वागत सोहळ्याचे नियोजन कणकवलीतील नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, यांच्यासह विषय समिती सभापती, गटनेते, भाजपा शहराध्यक्ष व शहरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून अंतिम टप्यात आल्याचे नलावडे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणे हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी देत कोकणच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला तो विश्वास येत्या काळात कणकवलीतील भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता सार्थ करून दाखविणार आहे. नारायण राणेंवर प्रेम करणारे कणकवलीतील कार्यकर्ते व जनता ही देखील यावेळी उपस्थित राहणार आहे.

कणकवली नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष, गटनेते, विषय समिती सभापती, नगरसेवक व शहराध्यक्ष यांच्यावर स्वागत सोहळ्याची जबाबदारी विभागून देण्यात आली असून, कणकवली नगरीत नारायण राणे यांचे स्वागत हा क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असेल असेही नलावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा