*कुडाळ पंचायत समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम*
कुडाळ :
दशावतार, भजन, किर्तन, ठाकर-आदिवासीकला , चित्रकथी, धनगरी नृत्य, फुगडया इत्यादी लोककलांना उर्जितावस्था आणण्यासाठी , त्यांचे संवर्धन होण्यासाठी तसेच या लोककलांच्या माध्यमातून ज्यांनी समाजप्रबोधन केले अशा कुडाळ तालुक्यातील वृद्ध कलाकारांची लोककला जनतेसमोर यावी , त्यांचा आदरसत्कार करणे , सन्मान करणे व त्यांच्यातील कला सादरीकरणास व्यासपिठ निर्माण करणेच्या उद्देशाने कुडाळ पंचायत समितीच्या पुढाकारातून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी क्रांती दिनाचे औचित्य साधून दि.9 ऑगस्ट 2021 रोजी सिद्धीविनायक हॉल , रेल्वेस्टेशन रोड , कुडाळ येथे सकाळी 9.30 वाजता या सर्व कलाकारांचा स्नेहमेळा , चैतन्यमेळा आयोजित करणेत आला आहे.
आपल्या संसाराचे अत्यंत गरीबीत व प्रतिकुल प्ररिस्थितीत रहाटगाडगे हाकत असताना, येथील स्थानिक कलाकार आपली कला सादर करताना दिसतात. पण हया लोककला सादर करताना मात्र हे कलाकार आपले वास्तव जीवन बाजुला ठेवून, उत्तमपणे या लोककलांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असतात. या लोककलांमध्ये कित्येक अशी कुटुंबे आहेत, जी आपली लोककला परंपरागत वारसाहक्काने मिळालेला अनमोल ठेवा म्हणून सांभाळत आहेत. मात्र एका बाजुला फारसा मोबदला मिळत नसताना, निव्वळ लोकाश्रयाच्या जोरावर हया लोककला सांभाळणे व दुसऱ्या बाजुला आपल्या मोडकया-तोडक्या संसाराचा गाडा हाकताना या कलाकारांचा जीव मेटाकुटीस येतो व हेच या कलाकारांचे वास्तव आहे.
अशाप्रकारे तारेवरची कसरत करुन आपल्यातील कलाकार जिवंत ठेवणाऱ्या या कलाकारांची खरी कसोटी तेव्हा लागते, जेव्हा त्यांच्या अंगातील ताकद कमी होवून तो वृद्धापकाळाकडे झुकतो, या वृद्धापकाळात ना त्याच्याकडे आयुष्यभर कमावलेली संपत्ती असते, ना पैसाआडका असतो. अशावेळी मात्र त्या कलाकाराच्या उमेदीच्या काळात या कलाकाराच्या कलेला दाद देणारे प्रेक्षकदेखील दखल घेताना दिसत नाहीत. आपल्या कलेतील आदाकारीच्या जोरावर ज्या कलाकाराने आयुष्यभर रंगमंचाची श्रीमंती राखलेली असतो, तो कलाकार आपल्या आयुष्याच्या रंगमंचावर मात्र अत्यंत गरीबीत दिवस ढकलत असताना दिसतो.
आज आपल्या जिल्ह्यामध्ये असे अनेक वृद्ध कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या वयाची साठी-सत्तरी पुर्ण केलेली असुन, वृद्धापकाळामुळे ते आपली कला सादर करणेस असमर्थ आहेत. परंतू हया कलाकारांनी आपल्या उमेदीच्या काळात सादर केलेली कला व समाजप्रबोधन हे फार वाखाणण्याजोगे आहे. हया कलाकारांनी अशा काळात आपली कला सादर केलेली आहे कि ज्या काळात आपल्या समाजामध्ये मनोरंजनाची कोणतीही साधने नव्हती , सोई सुविधा नव्हत्या .
अशा कालावधीत या कलाकारांनी आपल्या कलेद्वारे, दिवसभर शेतात राबून कष्ट करुन थकल्याभागलेल्या जनतेचे मनोरंजनातून प्रबोधन केले. स्वत: दिवसभर कष्ट करुन तसेच शिक्षणाचा फारसा गंध नसतानाही हया कलाकारांनी त्या काळात निव्वळ कलेद्वारे प्रत्येक मालवणी माणसाच्या ह्दयावर अधिराज्य केले, अनेक रंगमंच गाजवले, वाहवा मिळवली. परंतू त्यांचे हे आनंदाचे अविस्मरणीय क्षण कुठेही कॅमेराबद्ध नाहीत किंवा त्यांचे चित्रीकरण झालेले दिसुन येत नाही. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी केलेल्या हया समाजप्रबोधनाला कुडाळ पंचायत समितीचा मानाचा मुजरा.
अशाप्रकारे वृद्धत्वाने गांजलेले व आयुष्याच्या संध्याकाळी परिस्थितीशी झुंजणारे कित्येक गुणी कलाकार आज आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये आहेत. त्यांची आपल्याकडून फार मोठी अपेक्षा नाही आहे, त्यांना हवीय ती मायेची हाक व मदतीचा हात. नेमका हाच धागा पकडून, कुडाळ पंचायत समिती “श्रावणमेळा ” असा वृद्ध कलाकारांठी एक आगळा आणि वेगळा उपक्रम राबवीत आहे.
कुडाळ तालुक्यामध्ये राहणाऱ्या सर्व वृद्ध कलाकारांना एकत्र करुन, त्यांच्याशी हितगुज करणे, त्यांची आपुलकीने चौकशी करणे, त्यांच्यात लपलेल्या कलेला प्रोत्साहन देणे, मी कलाकार म्हणून एकटा नाही ही भावना वृदधींगत करणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांच्यातील कलाकाराला पुन्हा एकदा प्रोत्साहीत करुन भावना व्यक्त करणेची संधी देणे, त्यांची कला कॅमेराबद्ध् करणे इत्यादी प्रामाणीक उद्देश त्यामध्ये आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगणा कु मृणाल अजय सावंत हिच्या गणेश वंदना नृत्याने होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व सन्मानीय वृद्ध कलाकारांना एकत्रित करुन, त्यांना व्यक्त्ा होण्याची संधी दिली जाणार आहे . यात ह.भ.प.श्री.श्रीराम विनायक झारापकर बुवा, झाराप व ह.भ.प.सुरेश रघुनाथ माळगांवकर, बांव यांची किर्तनकला, भजनीबुवा श्री विनोद चव्हाण बुवा, भरणी व श्री मोहन नारायण कदम बुवा, हिर्लोक हे आपली भजनकला सादर करतील, फुगडी कलावंताना व धनगरी नृत्यकलेला शासन दरबारी मान्यता नाही. याकरिता शासन दरबारी सादरीकरणासाठी श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ , भैरववाडी, कुडाळ व श्री चामुंडेश्वरी फुगडी मंडळ , कविलकाटे, कुडाळ यांच्या फुगडीकला व अहिल्याबाई धनगर समाज मंडळ, गोठोस यांचे धनगरी नृत्य सादरीकरण होणार आहे.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ठाकर आदीवासी विविध लोककलांचे जाणकार श्री गणपत सखाराम मसगे,पिंगुळी यांचे सादरीकरण व त्यानंतर महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग – लक्ष्मीची पाऊले हा नाट्यप्रयोग हाणार आहे. यात कलाकार- यक्ष – कृष्णा गोसावी , नारद – सुरेश धुरी , शेतकरी – कृष्णा घाटकर , बलराम – दिलीप मेस्त्री , कृष्ण – बाळा सावंत , शिवगण – विलास तेंडुलकर ,सत्यभामा – आबा जोशी , रूक्मिणी – बाळा कळींगण ,महार – तुकाराम गावडे , म्हारीण – पंढरी घाटकर सहभाग घेणार आहेत.
सकाळी ९.३० वाजता औपचारीक उद्घाटन झालेवर विविध लोककलांचे सादरीकरण होईल व दुपारच्या सत्रात कार्यक्रम समारोपावेळी सर्व लोककलावंतांना सन्मानपत्रे देऊन गौरविण्यात येईल. यावेळी श्रीम.संजना सावंत अध्यक्ष जि प, आमदार श्री वैभव नाईक , श्रीम.के.मंजुलक्ष्मी जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग , श्री.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदूर्ग , श्री.अंकुश जाधव सभापती समाजकल्याण समिती जि.प.,श्री.कापडणीस अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. , श्री.सभापती श्रीमती नुतन आईर ,श्री.विजय चव्हाण गट विकास अधिकारी पं.स.,श्री.जयभारत पालव उपसभापती ,श्री.मोहन भोई सहाय्यक गट विकास अधिकारी पं.स.तसेच सर्व जि.प.व पं.स.सदस्य उपस्तित राहणार आहेत.
कुडाळ तालुक्यातील १७४ कलावंताना एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून , कला सादरीकरणासाठी व त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाचे सर्व पदाधिकारी , अधिकारी सज्ज आहेत. हे सर्व प्रत्यक्षात उतरणेसाठी भजन व दशावतार लोककलेचे गाढे अभ्यासक व वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष श्री राजा सामंत , दशावतारी लोककलेला सन्मान मिळावा म्हणून प्रयत्नशील असणारे श्री.राजेश म्हाडेश्वर , श्री.स्वरूप सावंत , श्री.दिपक भोगटे व सिद्धीविनायक हॉलचे मालक श्री.पेडणेकर हे प्रयत्नशील आहेत.