You are currently viewing भारताला आणखी एक मेडल, कुस्तीत रवीकुमार दहियाला सिल्व्हर मेडल

भारताला आणखी एक मेडल, कुस्तीत रवीकुमार दहियाला सिल्व्हर मेडल

टोकिया ऑलिम्पिकमध्ये भारताचं गोल्ड मेडल थोड्यात हुकलं. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कुस्तीच्या अंतिम लढतीत भारताच्या रवी कुमारने सिल्व्हर मेडल पटकावलं. 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात रशियाच्या झावूर युगुयेने रवी कुमारचा 7-4 असा पराभव केला. रवीकुमारने जबरदस्त लढत दिली, पण रशियाच्या झावूरने अनुभवाच्या जोरावर रवीकुमारवर मात केली.

पहिल्या फेरीनंतर रवी कुमार 4-2 असा पिछाडीवर होता. त्यानंतर रवीने दोन गुण मिळून बरोबरी केली. पण झावूरने आणखी 3 गुण मिळवत रवी कुमारवर 7- 4असा विजय मिळवला.

याआधी उपांत्य फेरीत रवी कुमारने कझाकस्तानच्या नुरिस्लाम सानायेव्हला चीतपट करून अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. चौथा मानांकित रवी सानायेव्हविरुद्धच्या लढतीत 2-9 असा पिछाडीवर होता. परंतु रवीने हिमतीने मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्याला चीतपट करीत डाव जिंकला.

रवीने प्री क्वार्टर सामन्यात कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरोसला 13-2 असे हरवले, तर क्वार्टर फायनलमध्ये बल्गेरियाच्या जॉर्जी व्हॅलेंटिनोव्हचा 14-4 असा पराभव केला.

टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरं सिल्व्हर मेडल आहे. याआधी भारताला मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल पटकावून दिलं होतं. तर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये, बॅक्सिंगमध्ये लव्हलिना बोर्गोहाने हिने आणि पुरुष हॉकी संघाने भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा