कुडाळ :
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काही वैशिष्ट्यपूर्ण दिवस मानले जातात. त्यातील बरेचसे जागरूकता निर्माण करणारे असतात. राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी एक ते सात ऑगस्ट दरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. यावर्षी देखील दिनांक १ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एका संयुक्त जबाबदारीने स्तनपान संरक्षित करा. या संकल्पनेतून सर्व आरोग्य संस्थेत स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. बॅ.नाथ पै शिक्षण संस्था संचलित बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने बहि:शाल योजनेअंतर्गत स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात या अनुषंगाने नर्सिंग महाविद्यालयातर्फे श्रीराम मॅटर्निटी हॉस्पिटल येथे दिनांक ४/ ८/ २०२१ ला ११ ते १२ या वेळेत याबाबत प्रशिक्षणपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी कुडाळ येथील श्रीराम मॅटर्निटी हॉस्पिटल मधील स्त्रीरोगतज्ज्ञ माननीय डॉ.सौ. विशाखा पाटील व्याख्याता म्हणून उपस्थित रहाणार आहेत व त्या सर्व गर्भवती स्त्रिया व प्रसूत झालेल्या स्त्रियांना व गरोदर असताना पाणी किती महत्त्वाचे आहे व त्याचा बालकांना व मातांना किती उपयोग होतो हे पटवून देणार आहेत.