कुठलेही संकट उभे राहिले, की बहुतेकांना पहिली आठवण देवाची होते,… पण सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गोरगरीब, गरजवंत व्यक्तींना देवाबरोबरच, एका देवमणसाची पण लगेच आठवण होते, आणि ती आठवण काढल्याबरोबर हाकेसारशी त्यांच्या मदतीला धावून येते, ती व्यक्ती म्हणजे मंगेश तळवणेकर! मग वाहन अपघात होऊन कुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनोळखी व्यक्तीला तातडीने इस्पितळात पोचवणे असो, की अत्यवस्थ रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देणे असो,… मंगेश तळवणेकर यांच्याबाबतीतली अशी शेकडो उदाहरणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींना माहीत आहेत.
अशातच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अचानक भारतात लॉकडाऊन जाहीर झाले, आणि संचारबंदीचा फटका माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही बसू लागला. अशावेळी दळणवळणाच्या सोयी बंद असताना, दुर्गमातील दुर्गम भागात पोचत, त्याठिकाणी कोरोनाची जनजागृती करत, मास्क, साबण, सॅनिटायझर्स, व अन्नधान्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची मदत तिथे मंगेश तळवणेकर यांनी वेळोवेळी पोचवली!
या संकट काळात प्रामुख्याने महाराष्ट्र गोवा सीमेवर पत्रादेवी इथे सीमाबंदीमुळे अडकलेल्या, व अतोनात हाल सोसणाऱ्या परराज्यातील शेकडो ट्रकचालकांना जेवण व अन्नधान्य पोचवणे असो, की आरोंदयातील कातकरी समाजाच्या व्यक्तींपर्यंत मास्क, साबण, सॅनिटायझर्स, व अन्नधान्य पोचवणे असो, की मग रस्त्यावरील भुकेने कासावीस झालेल्या कुत्रे, माकड, गायीगुरे अशा मुक्या जनावरांना अन्नाचा दररोज मायेचा घास भरवणे असो, समाजसेवेचे त्यांचे अविरत कार्य दररोज सुरूच आहे!
याकामी त्यांच्यासारख्याच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या बऱ्याच मंडळींची त्यांना साथ लाभली. यात देव्या सूर्याजी रक्तदाता संघटना, सौ.मीना गावडे यांच्यासारख्या अनेक समाजसेवी व्यक्तींची, तसेच प्रांताधिकारी श्री. सुशांत खांडेकर, सावंतवाडी तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन व पोलीस अधिकारी-कर्मचारी वर्गाची वेळोवेळी खूप चांगली साथ लाभली.
“समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा” हे ब्रीद आयुष्यभर पाळणाऱ्या या निष्काम कर्मयोग्याला उत्तम आयुरारोग्य लाभो, याच सर्वांतर्फे हार्दीक शुभेच्छा!