You are currently viewing राणेंनी कळणे मायनिंगबाबत भूमिका स्पष्ट करावी – आ. वैभव नाईक

राणेंनी कळणे मायनिंगबाबत भूमिका स्पष्ट करावी – आ. वैभव नाईक

 

महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी १३ वर्षापूर्वी विनाशकारी कळणे मायनिंग प्रकल्प जनतेच्या माथी मारला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून देत स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय करून गावातील शिक्षक, डॉक्टर अशा प्रतिष्ठित नागरिकांना व शिवसैनिकांना ३०२ सारख्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवून तुरुंगात टाकण्याचे काम राणेंनी केले. या प्रकल्पामधून हजारो लोकांना रोजगार देण्याचे आमिष दाखविण्यात आले. गेल्या १३ वर्षात कळणे मायनिंग प्रकल्पामुळे किती लोकांना रोजगार मिळाला…? किती लोकांची भरभराट झाली…?? हे नारायण राणेंनी एकदा जाहीर करावे. याउलट खनिज वाहुन नेण्यासाठी अनेकांनी डंपर विकत घेतले, ते तरुण आता कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे आता नारायण राणेंनी केंद्रीय उद्योगमंत्री झाल्यानंतर कळणेवासियांच्या जीवावर बेतलेल्या या कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

कळणे मायनिंग प्रकल्पातील मातीचा बांध फुटून पाण्याचा लोट वस्तीमध्ये घुसल्याची घडलेली घटना धक्कादायक आहे. यामुळे घरांचे शेतीचे नुकसान झालेच परंतु तेलाचा तवंग असलेला चिखल शेतीत गेल्याने पुढील अनेक वर्षे उत्पन्न देऊ शकणारी तेथील शेती, बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. मायनिंग प्रकल्प आणण्यासाठी पुढाकार घेणारे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेच याला सर्वस्वी जबाबदार आहेत. त्यांनी हा प्रकल्प रेटून नेला नसता, प्रकल्प विरोधी जनआंदोलनाचा विचार केला असता तर शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे हे नुकसान झाले नसते. मायनिंग प्रकल्पाच्या अट्टाहासामुळे निसर्गसंपन्न कळणे गाव होत्याचे नव्हते झाले. उद्योगमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या पदाचा दुरुपयोग करून नारायण राणेंनी कळणेवासियांना विनाशाच्या दरीत लोटण्याचे काम केले आहे. त्यांना जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी जनता कधीच माफ करणार नाही. असा आरोप आ. वैभव नाईक यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा