You are currently viewing जलजीवन मिशनअंतर्गत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान

जलजीवन मिशनअंतर्गत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान

सिंधुदुर्गनगरी

जल जीवन मिशन अंतर्गत 22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान  राबविण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार सन 2024 पर्यत प्रती व्यक्ती 55 लिटर शाश्वत शुध्द पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये संर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

        सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक रचना सागरी, नागरी व डोंगरी स्वरुपाची  आहे. उन्हाळ्यात ग्रामीण  भागाला पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत विविध कामे  हाती घेवून नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करुन, नवीन स्त्रोत निर्माण करुन नागरिकांनी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावयाचे आहे.

                  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नुकतीच कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता जिल्हा कक्षाचे सल्लागार व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना गाव कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये माहिती संकलन राबविण्याच्या प्रक्रिया कोबोटूलव्दारे माहिती अपलोड करणे आदि प्रशिक्षण  देण्यांत आले. दुसऱ्या टप्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, भुवैज्ञाननिक व तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी, उपअभियंता व शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲप व्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

गावकृती आराखडा प्रशिक्षणाचे आयोजन

            तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत 31 जुलै दरम्यान गावकृती आराखडा प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, पाणी व स्वच्छता समितीचे दोन सदस्य इत्यादी झुम ॲपव्दारे प्रशिक्षण आयोजन केले आहे.  गावपातळीवर 1 ते 3 ऑगस्ट या कालावधीत कोबो टूल साधनाचा वापर करुन गावकृती आराखडा तयार करण्याची माहिती देण्यात येणार आहे. 5 ते 7 ऑग्स्ट दरम्यान प्राप्त माहितीवरुन कृती आराखड्याची निर्मिती व गावकृती आराखडा प्रक्रिया करुन येत्या 15 ऑगस्ट 2021 रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मंजुरीकरिता कार्यक्रम प्रत्रिकेवर ठेवण्यांत येणार असल्याचे प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + eighteen =