मनाने का स्वतःला आतल्या आत कोंडून घ्यावे,
का बरे आपण तरी स्वतःच्या अंतरंगात गुंतावे.
विचारांना असते मुभा वाटेल तिथे भटकण्याची,
का बरे स्वतःच्या इच्छांना आत आवरून ठेवावे.
आसवही दुःखात ओघळून जातात गालावर,
का बरे हुंदक्याला गळ्यातच कुंपण घालावे.
भ्रमरही ते स्वच्छंदी फुलांचा रस शोषूनी जाती,
का बरे म्हणूनी फुलांनी उमलण्याचे सोडूनी द्यावे.
सकाळची सोनेरी किरणे क्षणात लुप्त होती,
का बरे किरणांनी क्षण सोनेरी लुटूनी मुक्त व्हावे.
निळ्याशार अवकाशी ढग काळे ते दाटुनी येती,
का बरे पावसाने घर डुबण्या स्वैर कोसळावे.
प्रश्न अनेक पडती क्षणोक्षणी मोकळ्या मनाला,
का बरे प्रश्नांना उत्तराने स्वतःहून सामोरे न यावे.
(दिपी)✒️
©दीपक पटेकर. सावंतवाडी
८४४६७४३१९६