न्हावनाचे खोरे प्रकल्पासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद खासदार विनायक राऊत यांच्या आग्रही मागणीला मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद
कुडाळ तालुक्यातील निरुखे गावामध्ये गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थांना पाण्याची गैरसोय भेडसावत होती. 2017 मध्ये सदर गावामध्ये ट्रॅकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करावे लागले होते. त्यानंतर गावातील उपलब्ध जलस्त्रोतांचे बळकटीकरण करून व नवीन जलस्त्रोत निर्माण करून त्याद्वारे काहीअंशी ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले होते.परंतु गावामध्ये शेतीसाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली जमीन त्यातच गावातील शेतकरी बांधवांचे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती उत्पन्न मिळवण्याचे प्रयत्न पाण्याअभावी त्यामध्ये अडथळे येत होते. गावातील प्रस्तावित असलेला न्हावनाचे खोरे धरण प्रकल्प पूर्ण करावा ही ग्रामस्थांची आग्रही मागणी होती.खासदार विनायक राऊत साहेब यांच्या निरुखे गाव भेटीमध्ये श्री करंदीकर, तसेच गावातील इतर पदाधिकारी, मुंबई ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ यांनी सदर प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आग्रही मागणी केलेली होती.एकंदरच गावातील भेडसावणारा पाण्याचा प्रश्न त्याचप्रमाणे शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी या सर्वांचा विचार करता हे धरण होणे हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक होते.
हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी खासदार विनायक राऊत साहेब व आमदार वैभव नाईक यांनी आपल्या स्तरावरून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होताच दिनांक 17/2/2020 रोजी खासदार विनायक राऊत साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांना निधी मिळावा यासाठी आग्रही मागणी केलेली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या सन 2021- 22 या आर्थिक वर्षाच्या आखणीमध्ये निरुखे धरणासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.व तशा प्रकारचे पत्र देऊन माननीय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री नामदार जयंत पाटील साहेब यांनी दिनांक 22 जुलै 2021 रोजी खासदार विनायक राऊत साहेब यांना कळविले आहे. त्यामुळे सदर धरण पूर्ण होण्याचा महत्त्वाचा असलेला आर्थिक तरतुदीचा टप्पा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे. सदर तलावाच्या माध्यमातून गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या पूर्ण होत असतानाच गावात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊन सुमारे 287 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे.व त्या माध्यमातून गावांमध्ये आर्थिक समृद्धीचे नवे दालन खुले होणार आहे.गेली अनेक वर्षाची आपली मागणी पूर्ण होत असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून खासदार श्री. विनायक राऊत साहेब यांचे आभार व्यक्त केले आहेत.अशी माहिती जिल्हा परिषद गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य श्री.नागेंद्र परब यांनी दिली आहे.