दोडामार्ग
विषारी अळंबी खाल्ल्यामुळे गिरोडे ता.दोडामार्ग येथील १३ जण अत्यवस्थ झाले आहे.त्यातील चौघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा-आजीलो रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे. याबाबतची माहिती मिळताच दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व भगवान गवस व सहका-यांनी त्या ठिकाणी धाव घेतली व संबंधितांना मदतकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हा प्रकार आज दुपारी घडला.याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.दरम्यान अशाप्रकारे अळंब्यातून विषबाधा झाल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. तर रानातील भाज्या खाताना सावधानी बाळगा,असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
याबाबतचीअधिक माहीती अशी की, संबंधितांनी दुपारच्या जेवणातून त्यांनी अळंबी खाल्ली होती.त्यांना अस्वस्थ वाटू लागले. येथील ग्रामीण भागात आज सकाळी जंगलात जावून अळंबी आणली. बहुतेक सगळ्यांनी एकाच ठिकाणाहून ती गोळा केली आणि घरी नेऊन शिजवली, मात्र ती खाल्ल्यावर त्यांना त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.अळंबी खाल्ल्याने विषबाधा झालेल्यामध्ये साळू अनंत गवस(वय११),चंद्रकांत सुरेश गवस(१६),प्रेमानंद शकुंतला नाईक(४०),अनंत जयराम गवस(५०),विकास अनंत गावडे(५९),रुपाली दिनेश गावडे(२३),सुनील जयराम गवस(४२) शीतल सुनील गवस(३५),उमेश गोविंद शेटकर(४०),ओंकार सुरेश गवस(१३),अनिता अनंत गवस(३५),रमेश जयराम गवस(५१),विठू नागेश गवस(४०) आदींचा समावेश आहे. डॉ.ऐवळे यांनी त्यांच्यावर उपचार केलेत.