You are currently viewing ३० सप्टेंबरला बाबरी मशीद प्रकरणाचा निर्णय

३० सप्टेंबरला बाबरी मशीद प्रकरणाचा निर्णय

नवी दिल्ली :

अयोध्येतील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय ३० सप्टेंबरला निर्णय देणार आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती एस के यादव यांनी लालकृष्ण आडवाणी, एमएम जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांच्यासह सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

सीबीआयचे वकील ललित सिंह यांनी सांगितले, की फिर्यादी आणि बचाव पक्ष दोन्ही पक्षांची सुनावणी १ सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर विशेष न्यायमूर्तींनी निकाल लिहणे सुरु केलं. सीबीआयने या प्रकरणात ३५१ साक्षीदार आणि ६०० दस्तावेज पुराव्याच्या स्वरुपात न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

६ डिसेंबर 1992 ला वादग्रस्त रचना विध्वंस प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजप नेता विनय कटियार, महंत नृत्य गोपाल दास आणि साध्वी रितम्बरा यांच्यासह एकूण 32 आरोपी आहेत.

यापूर्वी सुनावणी दरम्यान सर्व आरोपींना ऑनलाईन हजर केले होते. बाबरी विध्वंस प्रकरणातील कोर्टाचा निर्णय २८ वर्षानंतर येत आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने संबंधित खटला ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे विशेष न्यायालयाचा पूर्ण प्रयत्न असा आहे की या प्रकरणाचा निकाल मर्यादीत वेळेत सुनावावा.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने यापूर्वीच निकाल सुनावला. अयोध्येतील वादग्रस्त जागा रामललाची असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टात ६ ऑगस्टपासून सलग ४० दिवस अयोध्या प्रकरणावर सुनावणी झाली होती. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा