पर्यटनाच्या माध्यमातूनच समृद्धी येण्यासाठी प्रयत्न
माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद
कोकणचा कायापलट करण्याची शक्ती पर्यटनात आहे, येत्या काळात कोकण ग्रामीण पर्यटन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्राधान्य राहील, शांतता येईल तेव्हाच समृद्धी येईल, ही टॅगलाईन घेऊन आपण काम केलं त्यामुळेच सिंधुदुर्गात पर्यटक वळले. आता पर्यटन विकासाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात समृद्धी येण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास माजी राज्यमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संघटना अधिक वाढण्यासाठी आपण लक्ष घालणार, यावर खासदार विनायक राऊत यांच्यासोबत आपली दोन तास चर्चा झाली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांची ऑनलाइन पत्रकार परिषद झाली. कोविड पार्श्वभूमीवर यावर्षी वाढदिवस साजरा करण, हे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, आपण वाढदिनी मतदार संघात नसेन, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी विकासाच्या संकल्पना मांडल्या. मंत्री असताना कोट्यावधी रुपयांचा निधी सिंधुदुर्गात आणला, मात्र अधिकारांच्या उदासीनतेमुळे पन्नास टक्के निधी परत केल्याची खंत वाटते. यापुढे असं होणार नाही याची प्राधान्याने काळजी घेतली जाईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने चुकीचे ठेकेदार नेमल्याने पर्यटन विकासाची कामे चुकीच्या पद्धतीने झाली याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श मॉडेल म्हणून संपूर्ण भारतामध्ये नावारूपाला यायला हवा यासाठी येत्या काळात माझे प्रयत्न राहणार आहेत.
मेडिकल कॉलेज, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उभादांडा येथील पर्यटन प्रकल्प, आडाळी येथील एमायडिसी हे प्रकल्प लवकरच पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेडी येथील शेतकऱ्यांच्या माड बागायती चे नुकसान झाले, त्यांना आपण स्वतः आर्थिक मदत देणार आहे. नारळाची रोपही दिली जातील. पर्यटनाबरोबरच शेती व्यवसायात समृद्धी येण्यासाठी योजना राबविण्यात येतील असा विश्वासही केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.