पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री कारवाईत हस्तक्षेप करत असल्याने कारवाईस होतेय टाळाटाळ..मनसेचा गौप्यस्फोट
मनसेने आंदोलनातून मांडली जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या खऱ्या वारसांची व्यथा
सफाई कामगारांना वारसा हक्काने दिलेल्या चुकीच्या नियक्त्या रद्दपातल करून भूमिपुत्रांना न्याय द्यावा या मागणीसाठी मनसेने आज जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन छेडले.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्याने मनसेच्या आंदोलन लक्षवेधी ठरले. मुसळधार पावसात देखील आंदोलनकर्ते ठाण मांडून बसले होते.”आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय” असा जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार असून भूमीपुत्रांना न्याय देणार का? सांगली,कोल्हापूर, नांदेड अशा परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती जोमात…स्थानिक भूमीपूत्र कोमात,जिल्ह्यातील भूमीपुत्रांवर अन्याय होऊन देखील आमचे लोकप्रतिनिधी गप्प का.?फौजदारी कारवाईस दिरंगाई का?सरकारी काम सहा महिने थांब-टेबलाखालून खाणाऱ्यांची वाढतेय रांग?,आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा? अशा आशयाचे प्रश्न बॅनर च्या माध्यमातून प्रसिद्ध करून मनसेने जिल्ह्यापरिषदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.जिल्ह्यातील निद्रिस्त आमच्या लोकप्रतिनिधींना झोपेतून उठवण्यासाठीच आपलं आंदोलन असल्याचे मनसेने जाहीर करत भ्रष्ट प्रवृत्तींना पाठिशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण कोण आहेत ते जिल्हावासीयांच्या समोर आणणार असल्याचा इशारा यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनाला जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे वारस रोपिया फर्नांडिस,रामा सावंत,किरण मोरे यांनींही सक्रिय सहभाग घेतला होता.
दरम्यान दोन च्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्यास पाचारण केले. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात मनसेला आंदोलन करावं लागतंय हे आम्हा जिल्हावासीयांचे दुर्दैव आहे असून कारवाई टाळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री दबाव टाकत असल्याची चर्चा मंत्रालयात आहे असा गौप्यस्फोट यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला.आणि या दबावामुळेच चुकीच्या नियुक्यांवर कारवाईस प्रशासनाडून वेळकाढूपणा केला जात आहे.त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी टोकाचा दबाव आणतात मात्र आमच्या जिल्ह्यातल्या उमेदवारांवर अन्याय होऊन देखील आमचे लोकप्रतिनिधी गप्प का बसले आहेत असा सवाल मनसेने उपस्थित केला.या प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत फौजदारी कारवाई दाखल करावी भ्रष्टाचार कसा व कोणी कोणी केला ते समोर येईल अशी मागणी यावेळी मनसेने केली.
त्यावेळी आपण सर्व पदाधिकरी व पक्षीय स्तरावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली असून जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांचेवर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत.तसेच आज सर्वसाधारण सभेतही याबाबतीत आवश्यक सूचना करण्यात येतील असे आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सावंत यांनी आंदोलनकर्त्यांना केली.
त्या अनुषंगाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व साधारण सभेचे कामकाज चालू होताच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव,कुडाळ माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे,अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष सचिन ठाकूर,सुंदर गावडे,गुरू मर्गज,सर्वेश राणे,गजानन राऊळ, निखिल गावडे,राजेश टंगसाळी,अनिल कसालकर,वैभव धुरी आदी मनसे पदाधिकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.तर रावजी यादव,अमोल जंगले आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला.