कुडाळ तालुक्यातील महसुली गाव गांधीनगर (पाट) पूर्वीप्रमाणे पाच तलाठी सजास जोडण्यात यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे खा. विनायक राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कुडाळ तालुक्यात गाव मौजे पाट व गांधीनगर अशी २ महसूली गावे येतात. पाट मधील शेतकऱ्यांच्या जमिनी गांधीनगर महसुली गावात असून गांधीनगरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी पाट गावात आहेत. असे असताना गांधीनगर महसुली गावातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर तलाठी कार्यालय जोडण्यात आली आहे. त्यामुळे तलाठी ऑफिसमधील कामास जाण्यासाठी शेतकर्यांना १४ किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे. तरी गांधीनगर पूर्वीप्रमाणे तलाठी सजा पाट येथे कायम ठेवावे, अशी विनंती खा. राऊत यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
यापूर्वी २० ऑक्टोंबर २०२० रोजी तहसीलदार कुडाळ यांच्याकडे गांधीनगर गाव हुमरमळा तलाठी सजास जोडण्याबाबत अधिसूचना रद्द करण्याबाबत निवेदन करण्यात आले होते. या यावेळी निवेदन तहसीलदार यांनी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून तात्पुरती स्थगिती दिली होती.
मात्र ८ दिवसांपूर्वी पासून गांधीनगर महसूल गावाचे रेकॉर्ड हुमरमळा तलाठी सजा येथे गेल्याचे समजले. त्यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायतीकडे तक्रारी येत आहेत. आपण लक्ष घालावे आणि गांधीनगर (पाट) महसुली गाव पूर्वीप्रमाणेच तलाठी सजा पाट मध्ये जोडण्यात यावा, अशी मागणी पाट सरपंच रीती राऊळ यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जि प शिवसेना गटनेते नागेंद्र परब, माजी जि प अध्यक्ष विकास कुडाळकर, अतुल बंगे उपस्थित होते.