संजू परबांसोबत तेच चार चेहरे का ?
सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी माजी नगराध्यक्ष व स्वच्छ चारित्र्याचे म्हणून ओळखले जाणारे बबनराव साळगावकर व माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दीपक केसरकर यांनी संजू परब यांना चुकीचे आरोप केल्यास राजकीय कारकीर्द धोक्यात येईल असे गंभीरपणे सांगूनही आपल्या आरोपांवर ठाम राहत आरोपांचा पत्रकार परिषद घेत पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या केसरकरांनी भरगच्च पत्रकार परिषद घेत संजू परबांच्या आरोपांना आपला नगरसेवक उत्तर देऊ शकतो परंतु संजू परब यांच्यावर शेवटची पत्रकार परिषद म्हणत आरोपांचे खंडन करून शहर विकासासाठी वेळ सार्थकी लावण्याचा सल्ला दिला आहे.
संजू परब हे पत्रकार परिषद घेतात, माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, परंतु नगरपालिकेतील पक्षाचे नेतृत्व असलेले नगराध्यक्ष पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्याच सत्ताधारी गटाचे नगरसेवक मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याचे नेहमीच का टाळतात? असा प्रश्न सर्वसामान्य सावंतवाडीकर नागरिकांना पडला आहे. सत्ताधारी गटाकडे कायद्याचे ज्ञान असणारे वकील परिमल नाईक, कित्येक वर्षांचा अनुभव असलेले राजू बेग, नासिर शेख हे ज्येष्ठ नगरसेवक असताना देखील पत्रकार परिषदेस उपस्थित राहण्याचे टाळतात आणि प्रत्येक वेळेस संजू परब यांच्यासोबत अजय गोंदवळे शहरप्रमुख, केतन आजगावकर, आणि बंटी पुरोहित हेच का उपस्थित असतात? सत्ताधारी नगरसेवक पत्रकार परिषदेपासून दूर राहत असल्याने त्यांना हे आरोप देखील मान्य नसतील असाही एक मतप्रवाह होत आहे.
नगराध्यक्ष संजू परब यांच्यासोबत सत्ताधारी गटाचे नगरसेवक पत्रकार परिषदेला उपस्थित राहत नसल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचेच दिसत आहे. वरवर दिसणारी गटाची एकी आतून पोखरलेली तर नाही ना? असाही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहे. मध्यंतरी राजू बेग यांनी केलेलं कळशी आंदोलन हा देखील अंतर्गत संबंध बिघडले असल्याचेच दाखवत आहे.
नगराध्यक्षांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून पत्रकार परिषद घेताना पक्षाच्या शहराबाहेरील नेत्यांसोबत पत्रकार परिषदेला सामोरे गेले तरी चालते परंतु शहरातील गंभीर आरोपांवर पत्रकार परिषद घेताना तरी आपल्या सोबत सत्तेत भागीदार असणारे, सहभागी सत्ताधारी नगरसेवक सोबत घेतले पाहिजेत तरच सावंतवाडीच्या जनतेच्या विश्वासास ते पात्र ठरतील, अन्यथा शहरातील प्रतिष्ठित आणि आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप आपल्या राजकीय कारकिर्दीत नसणाऱ्यांवर आरोप करताना निदान तो कोणी करावा याचा देखील सावंतवाडीकर जनता योग्यवेळी विचार केल्याशिवाय राहणार नाही.