You are currently viewing योगायोगाने बनलेले नगराध्यक्ष

योगायोगाने बनलेले नगराध्यक्ष

संजू परब माझ्यासोबत येणार होते, का आले नाहीत?

सावंतवाडीचे नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर दीपक केसरकर यांनी संजू परब यांना सूचक इशारा दिला होता, परंतु संजू परब यांनी पुन्हा आपल्या शब्दांवर ठाम राहत पत्रकार परिषद घेत आरोपांचा पुनरुच्चार केल्याने आमदार दीपक केसरकरांनी भरगच्च पत्रकार परिषद घेत संजू परब यांच्या आरोपांना उत्तर दिले.
संजू परब यांच्यावर ही शेवटची पत्रकार परिषद यानंतर आपण बोलणार नाही, असे सांगताना त्यांनी संजू परब हे योगायोगाने झालेले नगराध्यक्ष आहेत. सावंतवाडीकरांनी त्यांना संधी दिली होती. आमचे उमेदवार बाबू कुडतरकर हे १००० मतांनी निवडून आले असते, परंतु बंडखोर उमेदवार दिलीप नार्वेकर यांनी साडेसातशे मते घेतल्याने ते पराभूत झाले. सावंतवाडीकरांनो आमिषाला बळी पडू नका, मग अशी लोकं सत्तेवर येतात अशा शब्दांमध्ये केसरकरांनी संजू परबांच्या टीकेला उत्तर दिले. संजू परब हे आपल्यासोबत येणार होते, परंतु का आले नाहीत?याचे उत्तर वेळ आल्यावर देणार असा सूचक इशारा देखील केसरकरांनी दिला.
सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आपण त्यांना स्वतःही सहकार्य करणार होतो. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते आपल्या संपर्कात होते, मला ते स्वतः भेटलेही होते. आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी आहे म्हणून त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं अन्यथा त्यांच्या आरोपांना आपल्या एखाद्या नगरसेवकाला देखील उत्तर द्यायला सांगितलं असतं, अशाप्रकारे नगराध्यक्षांच्या आरोपांना कोणी उत्तर द्यायचं याचीही त्यांनी माहिती दिली. नगराध्यक्ष असताना ते कधीही आपल्याकडे आले तर शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करणार आहे. उपोषण वगैरे ही स्टंटबाजी आहे, शहराच्या विकासासाठी तुम्हाला लोकांनी नगराध्यक्ष बसवलं आहे असे सांगत शहरासाठी काम करण्याचा सल्लाही दिला आहे. आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी टीका करणे ही जुनी पद्धत आहे, आणि त्याचाच अवलंब संजू परब करत असल्याने केसरकर यांनी त्याचा खरपूस समाचार घेताना टीका करून आमदार होता येत नाही. दीपक केसरकर यांच्यावर टीका केली की आपण आमदार होणार या अविर्भावात संजू परब आहेत असे सांगत त्यांच्या आरोपांची खिल्ली उडवली.
दीपक केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात सावंतवाडी शहराचा चेहरामोहरा बदलला होता. आपल्या हुशारीने त्यांनी नगराध्यक्ष असतानाही शहरासाठी भरीव निधी आणला होता. आपल्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये अथवा राज्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात देखील त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कधीही झाले नाहीत. त्यामुळे दीपक केसरकरांचे चारित्र्य संपूर्ण सावंतवाडीला माहिती आहे. आपल्या स्वच्छ चारित्र्यावर पहिल्यांदाच कोणीतरी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने केसरकर व्यथित झाले. भविष्यात आपण आक्रमक होणार असल्याचेही त्यांनी सूतोवाच केले, त्यामुळे दीपक केसरकरांची भविष्यातील भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − eight =