जिल्ह्यातील खऱ्या वारसांना न्याय मिळेल का?
सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मध्ये झालेल्या सफाई कामगारांच्या अनुकंपाखालील भरतीत घोटाळा झाल्याचे उघड झाले आणि भरती प्रकियेत सामील असणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले. सफाई कामगारांच्या भरती बरोबरच ग्रामपंचायत कर्मचारी भरती, अनुकंपा भरती आदी सर्वच भरती प्रक्रियेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले, त्यामुळे इतर भरती प्रक्रियेत देखील याच पाच जणांचे रॅकेट कार्यरत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
त्यामुळे सफाई कामगार भरती प्रक्रियेचा घोळ उघड करणारे मनसेचे नेते प्रसाद गावडे यांनी इतर भरती प्रक्रियेमध्ये घोळ झाला का याचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
सफाई कामगार भरतीमध्ये जिल्ह्यातील सफाई कामगारांचे वारस हे नांदेड, सांगली, कोल्हापूर येथील व्यक्ती दाखवून त्यांची बेकायदेशीरपणे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरती करण्यात आली. परंतु अशी भरती करताना आर्थिक गैरव्यवहार नक्कीच झाला असेल, आणि त्यात कोणी कोणाला किती पैसे दिले हे देखील चौकशी अंती उघड होईलच. परंतु आर्थिक व्यवहार करून भरती केलेले हे पाचही पराजिल्ह्यातील उमेदवार पुढे त्या पदांवर कार्यरत राहणार का? त्यांना चुकीच्या पद्धतीने दिलेली नियुक्ती रद्द होणार की नाही? आणि जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या खऱ्या वारसांना न्याय मिळणार का? असे प्रश्न मात्र आजही अनुत्तरित आहेत.
सफाई कामगारांची अनुकंपाखाली झालेली भरती प्रक्रिया ही चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने ती रद्दबातल करावी आणि अन्याय झालेल्या सफाई कामगारांच्या जिल्ह्यातील खऱ्या वारसांची त्या जागी नेमणूक करून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने झालेल्या भरती प्रक्रियेवर योग्य ती कारवाई केल्यास भविष्यात अशा गैर मार्गाने भरती प्रक्रिया करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसेल. जिल्ह्यातील आणखी काही भरती प्रक्रियांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, ज्यात मुख्यत्वे ग्रामपंचायत कर्मचारी भरती आहे, त्याबाबतही तक्रारी येत आहेत, त्यांचीही चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता जिल्हावासीयांकडून होऊ लागली आहे.