गळ्यावर हातांचा जोराने दाब पडल्याचे तपासात उघड
भाचीच्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
सावंतवाडी
सावंतवाडी सबनिसवाडा येथील सेवानिवृत्त एस टी वाहक रमेश राघो ठाकूर यांचा खूनच झाला असल्याचे तपासात उघड झालं आहे. शवविच्छेदन अहवालात रमेश ठाकूर यांच्या गळ्यावर हातांचा जोराने दाब पडल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, रक्ताच्या व तोंडातील फेसाच्या फॉरेन्सिक लॅब तपासणीनंतर त्याला अधिक पुष्टी मिळणार असल्याची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली असून त्यांच्या भाचीने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून खून करण्यात आला असून अंगावरील आठ तोळ्यांचे दागिने संशयितांनी चोरून नेल्याची फिर्याद मयत ठाकूर यांची गोव्यातील भाची मीनाक्षी चोडणकर यांनी दिली आहे.
एस टी महामंडळाच्या देवगड आगारातील सेवानिवृत्त वाहक रमेश राघो ठाकूर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत येथील सबनिसवाडा येथे त्यांच्या राहत्या घरालगत असलेल्या भाड्याच्या खोलीत गुरुवारी सकाळी कामगारांना आढळून आला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. रमेश ठाकूर हे अविवाहित असल्याने घरात एकटेच राहायचे तर त्यांनी भाड्याने देण्यासाठी तीन खोल्या घराशेजारीच बांधल्या होत्या. त्यांच्या घराच्या छपराचे काम सुरू होते.
गुरुवारी सकाळी चक्रा चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा मृतदेह बाजूच्या खोलीत संशयास्पद रित्या दिसून आला. याबाबत सावंतवाडी पोलिसात खबर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जमिनीवर रक्ताचा सडा पडल्याचे निदर्शनास आले. मृत रमेश ठाकूर यांच्या अंगावर नेहमी सोन्याची चेन व अन्य सोन्याचा ऐवज असायचा त्यामुळे बुधवारी मध्यरात्री कोणीतरी चोरीच्या उद्देशानेच घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यांसाठीच त्यांचा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता.