तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल, तितक्या लवकर सेवानिवृत्तीसाठी तुमच्याकडे मोठी रक्कम असेल, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञांकडून दिला जातो. अनेकदा आपण सुरुवातीच्या काळात जोखीम असलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवतो. मात्र सेवानिवृत्तीचा काळ जवळ आल्यानंतर अनेकदा आर्थिक जोखीम घेण्याची क्षमता कमी होती. यामुळेच अनेक ज्येष्ठ नागरिक फिक्सड डिपॉझिट योजनांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात.
या योजनेद्वारे त्यांना नियमित अंतराने पे-आऊट करण्याचा पर्याय देखील मिळतो. सध्याच्या काळात तुम्हीही एक ज्येष्ठ नागरिक म्हणून सर्वोत्तम व्याज दरासह एफडीच्या शोधात असाल, तर आम्ही तुम्हाला भरघोस व्याज देणाऱ्या काही एफडी योजनांमध्ये गुंतवणूकीच्या पर्यायांबद्दल सांगणार आहोत. यात पैसे गुंतवल्यानंतर तुमची रक्कम लगेचच दुप्पट होऊ शकते.
एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचे काही फायदे
रिटायरमेंटनंतर एफडीमध्ये गुंतवणूक करा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्हाला केवळ चांगले उत्पन्न मिळत नाही, तर पैसे साठवण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही यामध्ये नियमित उत्पन्नाची सुविधा मिळते. तसेच आकर्षक व्याजदरही मिळतो. अशा परिस्थितीत महागाईच्या तुलनेत एफडीकडून मिळणारा परतावा आणि कर याचीही काळजी घेतली पाहिजे.
कोणत्या बँकेत सर्वाधिक व्याज?
बँकबाजार वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना इंडसइंड बँकेच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळत आहे. सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँकांविषयी माहिती घ्यायची झाल्यास कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 7 टक्के व्याज मिळते. तर यात दुसर्या क्रमांकावर बंधन बँक आहे जी एफडीवर जास्तीत जास्त 6 टक्के दराने व्याज देत आहे. त्यापाठोपाठ अॅक्सिस बँक आणि भारतीय स्टेट बँक असून यात तुम्हाला अनुक्रमे 5.90 टक्के आणि 5.80 टक्के दराने व्याजदर मिळतो.
*ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर मिळणारा व्याज*
बँक व्याज (वार्षिक)
पंजाब नेशनल बँक 5.60%
कोटक महिंद्रा बँक 5.60%
एचडीएफसी बँक 5.65%
आईसीआईसीआई बँक 5.65%
इंडियन ओवरसीज बँक 5.70%
भारतीय स्टेट बँक 5.80%
अॅक्सिस बँक 5.90%
बंधन बँक 6.00%
इंडसइंडस बँक 7.00%
*महागाई दरही लक्षात ठेवा*
गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा दर हा 6 टक्क्यांच्या आसपास दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण गुंतवणुकीसाठी एफडीचा पर्याय निवडत आहे. यात तुम्हाला ठराविक उत्पन्न मिळवण्यासाठी व्याजदर हा कमीतकमी 6 टक्क्यांपेक्षा जास्त मिळतो. त्यामुळे अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी बहुतांश रक्कम मुदत ठेवी किंवा कोणत्याही टपाल योजनांमध्ये गुंतवणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. तसेच या रक्कमेचा काही भाग हा इक्विटी किंवा हायब्रीड फंडातही गुंतवावा, जेणेकरुन तुम्हाला काही प्रमाणात योग्य परतावा मिळेल.