You are currently viewing दोन कंपन्यांची ‘नॅस्डॅक’मध्ये नोंदणी

दोन कंपन्यांची ‘नॅस्डॅक’मध्ये नोंदणी

जागतिक पातळीवरील उद्योग क्षेत्रात गेल्या सहा महिन्यांत पुण्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पुण्यात नवउद्यमी म्हणून सुरू झालेल्या ‘पबमॅटिक’ या कंपनीचे समभाग डिसेंबरमध्ये, तर मूळच्या पुणेकर असलेल्या नेहा नारखेडे यांच्या ‘कॉन्फ्लुएंट’ या कंपनीचे समभाग जूनमध्ये अमेरिकेच्या शेअर बाजारात (नॅस्डॅक) दाखल झाले असून, पुण्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.

गेल्या काही वर्षांत शिक्षण, वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, संशोधन या क्षेत्रांसाठी पुण्याने जागतिक नकाशावर आपले स्थान ठळक केले आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन आता पुण्याशी संबंधित दोन कंपन्या नॅस्डॅकला नोंदणीकृत होणे पुण्यासाठी, पुण्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळेच ‘कॉन्फ्ल्युएंट’च्या संस्थापक संचालक नेहा नारखेडे आणि ‘पबमॅटिक’च्या संस्थापकांपैकी एक असलेले मुकुल कुमार यांच्याशी संवाद साधून ‘लोकसत्ता’ने त्यांचा प्रवास जाणून घेतला. या दोन्ही कंपन्या विदाआधारित उत्पादने विकसित करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या महिला उद्योजिकांमध्ये नेहा नारखेडे आघाडीवर आहेत. सहकारनगर भागात लहानाच्या मोठ्या झालेल्या नेहा यांचे शिक्षण कॅम्पमधील सेंट अ‍ॅनीज स्कूल, फग्र्युसन महाविद्यालय आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण घेतल्यावर काही काळ ‘लिंक्डइन’ या कंपनीमध्ये काम केले. जे क्रेप्स आणि जून राव या सहकाऱ्यांसह २०११ मध्ये ‘कॉन्फ्ल्युएंट’ची स्थापना केली. कंपनीचे समभाग १ जुलैला नॅस्डॅकमध्ये दाखल झाले. ‘पुण्यात लहानाची मोठी होणे, अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन सिलिकॉन व्हॅलीमध्ये कंपनीची स्थापना करणे, कंपनी सार्वजनिक करणे हा मोठा प्रवास आहे. नॅस्डॅकची घंटा वाजवण्याचा मान मिळालेली पहिली भारतीय महिला ठरल्याचा आनंद वाटतो,’ अशी भावना नेहा यांनी व्यक्त केली.

१५ वर्षांपूर्वी औंधमधील चार खोल्यांच्या सदनिकेत नवउद्यमीच्या रूपात सुरू झालेल्या ‘पबमॅटिक’ कंपनीचे कॅलिफोर्निया येथे मुख्यालय आहे. राजीव गोयल, अमर गोयल, मुकुल कुमार आणि आनंद दास यांनी या कंपनीची स्थापना केली. मुकुल कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे कार्यालयाचे कामकाज होते. डिसेंबरमध्ये या कंपनीचे समभाग नॅस्डॅकमध्ये दाखल झाले. ‘ऑनलाइन जाहिरातींच्या क्षेत्रात पबमॅटिक काम करते. आज कंपनीच्या जगभरातील कार्यालयांमध्ये सहाशे कर्मचारी कार्यरत आहेत. पुण्यातील कार्यालयाद्वारे नवसंकल्पना, नव्या उत्पादनांच्या विकसनाचे काम होते. विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे नवनव्या संधी निर्माण होत आहेत,’ असे मुकु ल कुमार यांनी सांगितले.

अमेरिकेतील नोकरी सोडून पुण्यात आलो. २००६ मध्ये पबमॅटिकची स्थापना केली. गेल्या पंधरा वर्षांतील कंपनीचा प्रवास अतिशय रोचक आहे. सुरुवातीला ऑनलाइन जाहिरातींच्या क्षेत्रात काम न करण्याचा सल्ला काहींनी दिला होता. मात्र जाहिरातीच्या एक हजार इम्प्रेशन्सपासून दोनशे दशलक्ष इम्प्रेशन्सपर्यंतचा टप्पा कंपनीने गाठला आहे.

– *मुकुल कुमार, सहसंस्थापक आणि अध्यक्ष अभियांत्रिकी, पबमॅटिक*

 

माझे वडील उद्योजक असल्याने मला स्वत:ची कंपनी असावी, यशस्वी व्यवसाय असावा असे नेहमीच वाटायचे. मात्र हे सगळे माझ्या करिअरच्या इतक्या लवकर घडेल असे वाटले नव्हते. माझी ही वाटचाल जगभरातील अनेक तरुणी, मातांना एक पाऊल पुढे टाकण्यासाठी प्रेरणा ठरेल अशी आशा आहे.

– *नेहा नारखेडे, सहसंस्थापक आणि  मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, कॉन्फ्ल्युएंट*

प्रतिक्रिया व्यक्त करा