You are currently viewing सेतु अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी प्राथमिक शिक्षकांना कोविड कामकाजातून वगळून शाळा सुरू करण्याची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

सेतु अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी प्राथमिक शिक्षकांना कोविड कामकाजातून वगळून शाळा सुरू करण्याची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरू राहावे यासाठी MSCRT पुणे मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील वर्षातील त्या त्या इयत्तेच्या मूलभूत क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील इयत्तेत प्रविष्ट झाल्यामुळे 1 जुलै ते 14 ऑगस्ट कालावधीत विद्यार्थ्यांसाठी 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. परंतु 15 जून पासून प्रत्यक्ष नियमीत शाळा सुरू होणार असे गृहीत धरून सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे व त्याची अंमलबजावणी शाळा सुरु न झाल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने करावी लागत आहे व त्यामध्ये विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शालेय स्तरावर सेतु अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी प्राथमिक शिक्षकांना कोविड कामकाजातून पूर्णपणे वगळून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची विनंती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस माननीय श्री म ल देसाई यांनी मा मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. अध्यक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, मा. शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, व मा. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे.
सदर सेतू अभ्यासक्रमा पैकी केवळ 30% भाग ऑनलाइन पद्धतीने घेणे शक्य आहे उर्वरित 70 % भागासाठी प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असायला हवेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भौगोलिक तसेच पावसाळ्यातील परिस्थितीचा विचार करता नेटवर्कच्या अडचणीमुळे हा 30% अभ्यासक्रम राबविताना सुद्धा अडचणी येत आहेत. बहुसंख्य पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत तसेच ज्या पालकांकडे मोबाईल आहेत ते कामानिमित्त बाहेर जात असल्यामुळे नियोजित अभ्यासाच्या वेळेत ते आपल्या पाल्याकडे मोबाईल देऊ शकत नाहीत. तसेच बहुतांश विद्यार्थी हे वाड्या-वस्त्या वरील असल्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. तसेच सदर अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रिंट स्वरूपात पुरवणे शाळेला तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक दृष्ट्या परवडणारी नाही. आपल्या जिल्ह्यात बऱ्याच शाळा सेमी इंग्रजी उर्दू माध्यमाच्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे काय? आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शिक्षकांच्या सेवा कोविड आपत्कालीन कामकाजासाठी अधिग्रहीत केलेल्या आहेत. वारंवार मागणी करूनही अद्याप त्यांना कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे एकावेळी अध्यापन व कोविड कामकाज करणे अशक्य आहे. तसेच शिक्षकांच्या rt-pcr टेस्ट न करता कोणताही लेखी आदेश नसताना शिक्षकांनी विद्यार्थी पालक यांचे संपर्कात जायचे कसे? उद्या काही दुर्घटना घडली तर प्रशासन त्याची जबाबदारी घेणार काय? त्यामुळे या सर्व समस्या अडचणी यांचा व्यावहारिक दृष्ट्या विचार व्हावा व त्यावर उपाययोजना म्हणून पुढील मागण्या संघटनेने केल्या आहेत.
*सेतु अभ्यासक्रमाच्या पुस्तिकांची शासनामार्फत छपाई होऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत पुरविण्यात यावी.
* हा सेतू अभ्यासक्रम ऑनलाइन घेणे अशक्य असल्यामुळे शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या कोविड ड्युट्या रद्द करून त्यांची rt-pcr टेस्ट करून चार पाच विद्यार्थ्यांना एकत्र करून किमान दोन-तीन तास शिकविण्यासाठी व कृती करून घेण्यासाठी शिक्षकांना लेखी परवानगी द्यावी
* किंवा विलगीकरण कक्ष नसलेल्या व covid-19 मुक्त गावातील शाळा मागील प्रमाणे दिवसातून तीन तास भरविण्याची परवानगी मिळावी
तरी या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन शालेय स्तरावर सेतु अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना कोविड कामकाजातून पूर्णपणे वगळून शाळा सुरू करणेस आदेशित करण्याची विनंती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस मा श्री म ल देसाई यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. अध्यक्षा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, मा. शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, व मा. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचेकडे केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + ten =