कुडाळ :
माणगाव खोऱ्यातील स्वप्ननगरी मोरे येथील दिव्यांगांच्या संस्थेतील दिव्यांग मुले व कर्मचारी कोव्हिड बाधित असताना त्यांची संपूर्ण सेवा करणाऱ्या कुडाळ एमआयडीसी नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांचा कुडाळ हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष सचिन मदने यांच्या हस्ते “रोटरी कोव्हिड वाॅरियर” गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले.
कुडाळ हायस्कूल येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. रोटरी अध्यक्ष सचिन मदने, डिस्ट्रिक 3170 चे असिस्टंट गव्हर्नर प्रणय तेली, मुख्याध्यापक अनंत जामसांडेकर, कमशिप्र मंडळाचे कार्यवाह भाई तळेकर, सेक्रेटरी अभिषेक माने, खजिनदार अमित वाळुंज, माजी अध्यक्ष काशिनाथ सामंत, शशिकांत चव्हाण, रवींद्र परब, आदित्य शिरसाठ आदी उपस्थित होते.
स्वप्ननगरी मोरे येथील दिव्यांगांच्या संस्थेस कोव्हिडबाधित आढळल्यानंतर या सर्वांवर संस्थेत राहून बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या 7 विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोव्हिडबाधित रुग्णांची सेवा करून त्यांना कोव्हिड मुक्त केले. त्यानंतर स्वतःही 7 विद्यार्थी 14 दिवसाचा विलगीकरण कालावधी पूर्ण करून घरी परतले. यामध्ये अक्षय सावंत, ऋतुजा प्रभू, ज्योती चव्हाण, कमल खोत, प्रतिमा सावंत, अभिषेक कदम, संकेत धुरी यांना रोटरी क्लब च्या वतीने गौरवपत्र देऊन अध्यक्ष सचिन माने यांच्या हस्ते गौरविण्यात आले.