You are currently viewing आंबोलीतील हॉटेल व पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या – गजानन पालेकर

आंबोलीतील हॉटेल व पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या – गजानन पालेकर

ग्रामस्थ-व्यावसायिकांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी…

आंबोली

येथील हॉटेल व पर्यटन संबंधी व्यवसाय बंद असल्यामुळे व्यवसायिक मेटाकुटीला आले आहेत.गेली तीन वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले येथील पर्यटन व व्यवसाय तात्काळ सुरू करण्याची परवानगी द्या,अशी मागणी सरपंच गजानन पालेकर यांनी व्यवसायिक व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.दरम्यान या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्यास सर्व नियमांचे काटेकोर पालन करून आम्ही प्रशासनाला सहकार्य करू,असा शब्दही त्यांनी यावेळी दिला आहे.याबाबतचे निवेदन श्री.पालेकर यांनी प्रसिद्धीस दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,आंबोली येथील पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे सद्यस्थितीत पूर्णता बंद आहे.त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यवसाय व इतर व्यवसाय मेटाकुटीला आले आहेत. तीन वर्षांपूर्वी आंबोली घाटात दरड कोसळल्यामुळे आणि आता कोरोना महामारी संकटामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे.याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील सुमारे तीनशेहून अधिक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची उपजीविका होते.त्यात काही कुटुंबे या हंगामात मक्याची कणीस विकून आपली पुंजी करतात व वर्षभर उदरनिर्वाहासाठी त्यावरच अवलंबून असतात. दरम्यान सद्यस्थितीत कोरोनामुळे गेली दोन वर्ष येथील छोटे-मोठे सर्वच व्यवसाय पर्यटन हंगामात बंद ठेवण्याची वेळ आली आहे.तर दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी घाट कोसल्यामुळे असेच संकट ओढवले होते. त्यामुळे सलग तीन वर्ष येथील पर्यटन काही ना काही कारणास्तव विस्कळीत झाल्यामुळे येथील व्यवसायिकांची मोठी कुचंबणा झाली आहे.दरम्यान सद्यस्थितीत या ठिकाणी कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे.त्यामुळे येथील स्थानिकांची उपजीविका असलेले पर्यटन व त्यावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय तात्काळ सुरू करण्याची परवानगी द्या,असे म्हटले. तर सकारात्मक निर्णय झाल्यास आम्ही कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करत प्रशासनाला सहकार्य करू,असा शब्दही यावेळी देण्यात आला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनावर उपसरपंच सदाशिव नार्वेकर,ग्रामपंचायत सदस्य महेश पावसकर,दशरथ गावडे,गोपाळ गावडे,रमेश राऊळ, विश्वास सावंत,विलास परब, सुरेश गावडे ,विजय गावडे, भैरू पाटील, लक्ष्मण पाटील ,सुरेश गावडे ,विजय गावडे, ज्ञानेश्वर गावडे ,वामन पालेकर आदींच्या सह्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =