मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असून, त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून, त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भाजपा नेत्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार असून, याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं वृत्त आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांना स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर इतर नेत्यांचीही नावे चर्चेत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून, केंद्राकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातत्याने मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि भाजपातील नेत्यांशी चर्चा सुरू आहे. आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावली असून, त्यात मंत्रिमंडळ विस्तारात अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं वृत्त आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार असून, या बैठकीला भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर महत्त्वाचे मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. याच आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे, मात्र याबाबत कुणीही वाच्यता केलेली नाही.
घटनेप्रमाणे मंत्रिमंडळात ८१ मंत्र्यांचा समावेश करता येऊ शकतो. सध्या मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ ५३ जणांचं आहे. त्यामुळे विस्तार करताना २८ जणांची वर्णी लावता येऊ शकते, पण किती जणांचा समावेश केला जाईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांची वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता आहे. त्याबरोबर हिना गावित यांच्या नावाचीही चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांनाही केंद्रात घेणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, ही सध्या तरी हे चर्चेतच आहे.
अनेक भाजपा नेत्यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे. यामध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल, लोक जनशक्ती पक्षाचे नेते पशुपती पारस, नारायण राणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. या विस्तारात भाजपामधील नेत्यांबरोबरच एनडीएतील मित्र पक्षांनाही स्थान मिळणार असल्याचं वृत्त आहे.