कर्मचारी भरतीत झाले होते चुकीचे काम! आयुक्तांच्या चौकशीनंतर सीईओंनी दिले निलंबनाचे आदेश
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्त्या देताना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील तब्बल पाच अधिकाऱ्यांवर आयुक्तांच्या आदेशानुसार निलंबनाची कारवाई झाली आहे. सहायक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी असलेल्या श्रीमती मनीषा देसाई, विनायक पिंगुळकर’ आनंद राणे’ जगदीश सावंत, व विनायक प्रभू या पाच अधिकाऱ्यांना, सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जि.प. सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे.
लाड पांगे समितीच्या शिफारशीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्त्या देताना भ्रष्टाचार व वशिलेबाजी झाल्याबाबत कामात कसूर केल्याबद्दल मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. जिल्हा परिषदेतील सफाई कामगारांच्या पाच वारसांच्या या नियुक्त्या देताना जिल्हा परिषद प्रशासनाने चुकीचे काम केल्याबाबत आयुक्तांचे पुराव्यासह लक्ष वेधले होते. त्यानुसार आयुक्तांच्या आदेशावरून उपायुक्तांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली होती. या नियुक्त्या आरोग्य विभागाने द्यायच्या होत्या. मात्र त्या जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ही भरती प्रकरणे आरोग्य विभागाकडून काढून घेत या पाच प्रकरणात भरती प्रक्रिया केली हाेती. आरोग्य विभागातील जे सफाई कामगार स्वेच्छानिवृत्ती घेतात तेव्हा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीस नियुक्ती देण्याचा शासन निर्णय होता. मात्र नियमानुसार ही भरतीप्रक्रिया आरोग्य विभागाने राबवायची असताना ती सामान्य प्रशासन विभागाने राबविली. तसेच नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला बदल करून व सफाई कामगार या पदावरच नियुक्ती देण्याचे बंधन असताना अन्य पदावर नियुक्ती दिल्याचे उघड झाल्यानंतर याबाबतची तक्रार झाली. या तक्रारीची आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली. याप्रकरणी चौकशी पूर्ण करून या प्रकरणात सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर जीपच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानुसार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई केली. या पाच नियुक्त्यांच्या प्रकरणा बाबत चुकीचे काम झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे असा ठपका ठेवून ही कारवाई झाली आहे. उपायुक्तांमार्फत झालेल्या चौकशीत भरती प्रक्रियेचे कागदपत्र तसेच घेतलेले जाबजबाब यामध्ये गैरव्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे. या भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला असून याशिवाय जिल्हा परिषदेतील अन्य काही भरती प्रकरणांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग जि.प. च्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनीषा देसाई, प्राथमिक शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर, महिला व बालकल्याण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी अानंद राणे, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी जगदीश सावंत, वित्त विभागातील सहायक प्रशासन अधिकारी विनय प्रभू या पाच अधिकाऱ्यांवर या भरती प्रक्रियेत चूकीच्या दिल्याप्रकरणी त्याने केलेल्या चौकशीत ठपका ठेवण्यात आला होता. या पाच प्रकरणांची चौकशी पूर्ण होताच या अधिकाऱ्यांचे निलंबन आयुक्तांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी केल्याने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.
याशिवाय अनुकंपा भरती तसेच अन्य भरतीतही प्रशासनाने चुकीचे काम केल्याच्या तक्रारी आहे.या भरतीत वशिलेबाजी व भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी असून ही प्रकरणे बाहेर येतील म्हणून अधिकाऱ्यांनी या कारवाईमुळे धाबे दणाणले आहेत.