भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन
मुंबई :
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
दरम्यान याप्रकरणी भाजप आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासंबंधी तडकाफडकी बैठक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात सुरू असून हे 12 आमदार आज संध्याकाळी 05:45 वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांचे निलंबन आवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच भाजप नेते आशिष शेलार यांनी हे सरकार तालिबानी सरकार असल्याची टीका केली आहे. निलंबित आमदार आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज संध्याकाळी भेट घेणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन एक वर्षासाठी निलंबित झालेले भाजपचे आमदार नेमकी काय मागणी करणार आणि राज्यपाल त्यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चांगलंच रण पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या भाजपचे निलंबित आमदार हे विधानसभेच्या उपाध्यक्ष यांच्या दालनात गेले असून निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.