नगराध्यक्षांचे आवाहन
सावंतवाडी
कोरोना महामारी मुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या पथविक्रेत्यांना केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेतून दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. याचा लाभ गतवर्षी सावंतवाडी शहरातील अनेक पथ विक्रेत्यांना करून देण्यात आला होता. त्यांनी या कर्जाची त्वरीत परतफेड करून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीचा मोठा परिणाम शहरातील पथविक्रेत्यांवर झालेला असून त्यांचा व्यवसाय बंद झालेला होता. अशा पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय परत सुरु करण्यासाठी खेळते भांडवल मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने १ जून २०२० रोजी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ह्या योजनेची घोषणा केली होती.
त्यानुसार आतापर्यंत सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील २५६ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा कर्ज पुरवठा बँकेमार्फत करण्यात आलेला आहे.
या योजनेचा दुसरा व तिसरा टप्पा सुरु झालेला असून पहिल्या कर्जाची रक्कम वेळेत परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील २० हजार तसेच हे परतफेड केल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील ५० हजारांचे कर्ज पथविक्रेत्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरी ज्या पथविक्रेत्यांनी पहिल्या टप्प्यातील कर्ज घेतले आहे त्यांनी आपल्या या कर्जाची परतफेड वेळेत करून योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कर्ज पुरवठ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.