सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे यांनी वेधले मुख्यमंत्री ठाकरेंचे लक्ष
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्पिता दरीपकर यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक देण्यासाठी अडथळा आणणाऱ्या आरोग्य विभागाच्या कोल्हापूर उपसंचालकांची तक्रार राष्ट्रीय काँग्रेसचे सावंतवाडी उपतालुकाध्यक्ष सच्चीदानंद बुगडे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, पालकमंत्री उदय सामंत, कोल्हापूर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे ईमेल आणि लेखी पत्राद्वारे केली आहे. एकीकडे कोरोना काळात सिंधुदुर्गात शासकीय रुग्णालयांत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाणवा आहे. तर दुसरीकडे ज्यांच्याकडे या पदभरतीचे प्रशासकीय अधिकार आहेत ते आरोग्य विभागाचे उपसंचालकच सिंधुदुर्गात वैद्यकीय सेवा करू इच्छिणाऱ्या डॉक्टर ना नाउमेद करत त्यांना नेमणूक देण्यास नकार देतायत. आरोग्य विभागातील मेगा भरती च्या जाहिरातीनुसार स्त्रीरोगतज्ञ असलेल्या डॉ. अर्पिता दरिपकर यांनी मुंबईत आरोग्य भवन येथे मुलाखत दिली. त्यावेळी डॉ. दरीपकर यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती मिळू शकेल, त्याबाबत उपसंचालक कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यानुसार डॉ. अर्पिता दरीपकर यांनी आरोग्य विभाग उपसंचालक कोल्हापूर येथे गेल्या. मात्र तेथे त्यांना क्षुल्लक कारणावरून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती देण्यास नकार दिला. सच्चीदानंद बुगडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री.बाळासाहेब गावडे व जिल्हा सरचिटणीस श्री. आनंद परुळेकर व तालुका काँग्रेस अध्यक्ष श्रीमहेंद्र सांगेलकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाने मुख्यमंत्री, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. नानासाहेब पटोले, आरोग्यमंत्री ना.श्री.राजेश टोपे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री यांचे लक्ष वेधले आहे. आरोग्य विभागाच्या कोल्हापूर येथील उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट बेबंदशाहीला आळा घालावा अशी मागणी बुगडे यांनी केली आहे.