You are currently viewing ‘डेल्टा’बाधित मिळालेल्या परिसरातील नागरिकांचे लसीकरण करणार : समीर नलावडे

‘डेल्टा’बाधित मिळालेल्या परिसरातील नागरिकांचे लसीकरण करणार : समीर नलावडे

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण कणकवली शहरातील कामत सृष्टी कॉम्प्लेक्समध्ये आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर कणकवली नगरपंचायतने या अनुषंगाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या होत्या. संबंधित कॉम्प्लेक्समधील सर्व नागरिकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करून झाल्यानंतर कोविडचा प्रसार होऊ नये व त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून त्या कॉम्प्लेक्समधील व आजूबाजूच्या परिसरातील ३१० नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे.

कणकवली शहरात आधीच कोरोनाचा फैलाव वाढलेला असताना त्यात पुन्हा कोविड डेल्टा प्लसचा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा डेल्टा प्लसचा रुग्ण आता ठणठणीत बरा झाल्याने नागरिकांनी घाबरून न जाता कोविड नियमांचे पालन करून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष व नगरपंचायतने केले होते.

या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने तातडीने त्या भागातील नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण करून घेण्यात आले. उर्वरीत नागरिकांचेही लवकरच लसिकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा