मनसेचे घंटानाद आंदोलन.
कोरोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे, पहिल्या लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आला नव्हता, परंतु कोरोनाची दुसरी लाट मात्र गावागावात पसरली आणि योग्य ती काळजी न घेतली गेल्याने अनेकांचे जीव गेले. जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकाला दुसरे एक कारण म्हणजे जिल्ह्याची कमकुवत आरोग्य यंत्रणा. जिल्ह्यात अनेक राजकीय नेते होऊन गेले परंतु जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडे गंभीरपणे कोणीच पाहिले नाही, त्यामुळे कोरोना सारख्या महामारीत जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडले. सरकारी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, स्वच्छता, तज्ञ डॉक्टर्स ची कमतरता आणि बेडची असणारी कमी यामुळे जिल्ह्यातील काही खाजगी कोविड सेंटरला मान्यता देण्यात आली.
खाजगी कोविड सेंटरचा अनेक पैसेवाले लोक लाभ घेत होते, परंतु सरकारी रुग्णालयातील अपुऱ्या बेडच्या व्यवस्थेमुळे आपला जीव वाचविण्यासाठी काही गरीब, सर्वसामान्य लोकांना खाजगी कोविड सेंटर चा आसरा घ्यावा लागला आणि तिथेच या खाजगी कोविड सेंटर मधून कोरोनाच्या नावावर होत असलेली पैशांची लूट समोर येऊ लागली. चार पाच दिवस ऍडमिट असणाऱ्या रुग्णांकडून पन्नास साठ हजारांची बिले घेतली गेली, काही बरे झालेले रुग्ण किव्हा सिरीयस झाले म्हणून कोल्हापूर, मुंबई आदी ठिकाणी शिफ्ट होणारे रुग्ण यांना बिल भरल्याशिवाय सोडलं जात नाही. प्रत्येक पेशंटला दरदिवशी पीपीई किटचे पैसे लावणे अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे संवाद मीडियाने याबाबत आवाज उठवला होता. संवाद मीडियाच्या वृत्ताची दखल घेत मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी खाजगी कोविड सेंटर मधून शासनाने आखून दिलेल्या दरापेक्षा जास्त बिले आकारून सर्वसामान्य रुग्णांची होत असलेली लूट या विरोधात उद्या कणकवली येथील प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून शासनाला जाग आणणार असल्याची माहिती दया मेस्त्री यांनी दिली आहे.
मनसे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचा प्रश्नांवर नेहमीच जनतेसोबत असते. माजी आमदार परशुराम उपरकर हे अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवतात. त्यामुळे शासनाला जाग येऊन सर्वसामान्य, गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मनसे करत असते. एकीकडे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टेस्ट वाढविण्यात आल्या तर दुसरीकडे वाढलेल्या रुग्णांना खाजगी कोविड सेंटरचा आसरा घ्यावा लागत असून तिथे त्यांची लूट होते त्यामुळे शासनमान्य लूट अशीच परिस्थिती सर्वसामान्य लोकांची झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या महामारीला आळा घालण्यासाठी काही तालुक्यांमध्ये खाजगी कोविड सेंटरना मान्यता देण्यात आली होती. शासकीय दर देखील ठरवून देण्यात आले होते. परंतु रुग्णांची लूट करताना गोरगरीब रुग्णांना सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा मिळण्याचा निर्णय होऊन देखील तो लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे गोरगरिबांना जीव वाचविण्यासाठी घरात खायला अन्न नसतानाही खाजगी कोविड सेंटरची बिले भरावी लागली आहेत.
जिल्ह्यातील जनतेची लूट होत असताना संबंधित शासकीय यंत्रणा मात्र सुशेगाद आहे. खाजगी कोविड सेंटर मधून शासकीय दरात रुपचार मिळतात का? सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो का? सरकारी नियमांची अंमलबजावणी तिथे होते का? याबाबत संबंधित यंत्रणेने खाजगी कोविड सेंटरमध्ये जाऊन तपासणी करायला हवी होती परंतु ती होत नसल्याने सरकारला जाग आणण्यासाठी मनसेने उद्या कणकवली येथील प्रांत कार्यालयासमोर परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.