बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

कुडाळ :

“समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे स्वातंत्र्यापूर्वीच अमलात आणणारे ‘महाराजांचे महाराज म्हणजे’ शाहू महाराज. बहुजनांचा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. सामाजिक क्रांतीचे प्रणेते ,सामाजिक परिवर्तनाला गती देणारे, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी झटणारे लोकनेते म्हणजे छत्रपती शाहू महाराज.” असे उद्गार प्रा अरुण मर्गज यांनी काढले.

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने शाहू महाराजांना जी राजर्षी पदवी दिली. त्या पदवीला साजेसे कार्य करणारे, पारंपरिक जातीभेदाला कडाडून विरोध करत, ते निर्मूलनासाठी कायदे करणारे, आरक्षणाच्याद्वारे सामाजिक समता प्रस्थापित करू पाहणारे लोकनेते म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत.

संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला, कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय मिळवून देणारे, शैक्षणिक समानता प्रस्थापित करण्यासाठी वसतिगृहांची सोय करून वंचितांना शिक्षणाद्वारे सन्मान मिळवून देण्याचे महान कार्य करणारे रयतेचे लोकराजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणजे छत्रपती शाहू महाराज. अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करीत ज्यांनी विविध समाजासाठी शाळा सुरू केल्या, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, जातीभेद दूर करण्यासाठी, आंतरजातीय विवाहाला मान्यता देऊन, विधवा पुनर्विवाहाचा मान्यता देणारे कायदे केले.

राधानगरी धरणाच्या उभारणीने वीज व पाणी टंचाई दूर करून शेतकऱ्यांना सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत आणले व उपेक्षित समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून दिले असे लोकराजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय. अशाप्रकारे त्यांचा गौरव करत त्यांनी केलेल्या महान कार्याचा उपस्थितांना परिचय करून  दिला. व त्यांच्या अन्य सहकार विषयक, शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्यांची  उपस्थितांना ओळख करून  दिली.

यावेळी सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांतर्फे पुष्प अर्पण करण्यात आली. यावेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. पल्लवी हरकुळकर, प्रा. पूजा म्हालटकर, किरण करंदीकर, पांडुरंग पाटकर, संतोष पडते, सुनिल गोसावी, लक्ष्मीकांत हरमलकर, विशाल सावंत, गजानन टारपे व  बीएड महाविद्यालयाचे प्राध्यापक, महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक, रात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी इ.उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा