नागरिकांनी घाबरु जाऊ नये; नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या हाती
कणकवली
कणकवली शहरात रेल्वे स्टेशन जवळ डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचार अंती बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबररुन जाऊ नये. कणकवली नगरपंचायत हा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून, नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. डेल्टा प्लसचा रुग्ण महिन्याभरापूर्वी पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र तो रुग्ण ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहत आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये कोविडच्या संसर्गाचा प्रसार झालेला नसल्याचेही श्री नलावडे यांनी सांगितले.
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्या कॉम्प्लेक्समधील नागरिकांचे स्वँब घेण्यात येत असून, कॉम्प्लेक्स मधील प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात येत आहे. सदर सापडलेला रुग्ण हा पूर्ण उपचार झाला असुन ठणठणीत बरा झाला आहे. कणकवली नगरपंचायत, आरोग्य विभाग व महसूल विभाग यांच्याकडून नियमित आढावा घेण्यात येत असून, रेल्वे स्टेशनच्या त्या भागातील लोकांची आरोग्य विषयक माहिती ही संकलित करण्यात येत आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांनी कोविड च्या त्रिसूत्री चे पालन करत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.